अजित पवारांनी संयमाने बोलले पाहिजे. पोपटासारखी दुसऱयावर टीका करण्यापेक्षा आपली धोरणे जनतेला सांगितली पाहिजेत. अजित पवारांच्या अशाच सभा सगळीकडे झाल्या, तर आमचं काय होईल, अशी प्रतिक्रिया राज्याचे वनमंत्री पतंगराव कदम यांनी सोमवारी सांगलीत व्यक्त केली. ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अजित पवारांवर टीका केली. 
सांगली महापालिकेच्या निवडणुकीत कॉंग्रेसला एकहाती सत्ता मिळाल्यानंतर पतंगराव कदम यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. सांगली महापालिकेच्या निवडणुकीत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांनी एकमेकांच्याविरोधात निवडणूक लढवली. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये हे दोन्ही पक्ष एकत्रित निवडणूक लढविणार आहेत. त्यापार्श्वभूमीवर बोलताना पतंगराव कदम यांनी अजित पवारांना संयमाने बोलण्याचा सल्ला दिला. दुसऱयावर टीका करणाऱया अजित पवारांच्या सभा सगळीकडे झाल्या, तर आमचं काय होईल, अशी भीतीही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
ते म्हणाले, या निवडणुकीत प्रतीक पाटील, मदन पाटील, विश्वजीत कदम आणि मी आम्ही सगळ्यांनी एकत्रपणे काम केले. महाआघाडीने लोकांना केवळ थापा मारल्या. त्याचवेळी आम्ही विधायक आणि विकास कामांचा आपल्या भाषणात उल्लेख केला. त्याचा आम्हाला निवडणुकीत फायदा झाला.