काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री  डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनाने राज्याच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रातील समर्पित व अजातशत्रू नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे, अशा शब्दात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनावर दुःख व्यक्त करताना खा. चव्हाण म्हणाले की, आ. डॉ. पतंगराव कदम आयुष्यभर काँग्रेस विचारांशी एकनिष्ठ राहिले. सहावेळा आमदार आणि सहकार, शिक्षण, महसूल, मदत व पुनर्वसन, वन अशा विविध खात्यांचे मंत्री म्हणून काम करत असताना त्यांनी सांगली जिल्ह्याच्या आणि राज्याच्या विकासात मोलाचे योगदान दिले. पक्ष संघटनेतही विविध पदांवर कार्यरत असताना काँग्रेस पक्षाचा विचार सामान्यांपर्यंत पोहोचवून संघटना बळकट करण्याचे काम त्यांनी केले.

डॉ. पतंगराव कदम यांनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत आपले शालेय शिक्षण पूर्ण करून काही दिवस शिक्षक म्हणून रयत शिक्षण संस्थेत नोकरी केली. सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना उच्च शिक्षण मिळावे म्हणून त्यांनी भारती विद्यापीठाची स्थापना केली. भारती विद्यापीठाच्या देश आणि परदेशात १८० शाखा असून ही भारतातील नामवंत आणि अग्रेसर संस्थांपैकी एक मानली जाते.

शैक्षणिक क्षेत्रासोबतच सोनहिरा सहकारी कारखाना, सागरेश्वर सहकारी सूत गिरणी, कृष्णा-वेरळा सहकारी सूत गिरणी, ग्राहक भांडार आणि मल्टीशेड्यूल्ड बँक अशा विविध सहकारी संस्थांची स्थापना करून सहकार क्षेत्रात मोलाचे योगदान दिले. राजकारण, समाजकारण, शिक्षण, सहकार, क्षेत्रासोबतच त्यांनी कला व क्रीडा क्षेत्रातही मोलाचे योगदान दिले. राजकारणापलीकडे त्यांचे विविध पक्षांतील नेत्यांशी अत्यंत जिव्हाळ्याचे व मैत्रीचे संबंध होते. त्यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाची मोठी हानी झाली आहे. आ. डॉ. पतंगराव कदम यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करून काँग्रेस पक्ष कदम कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.