काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांचे मुंबईतील लीलावती रूग्णालयात शुक्रवारी रात्री निधन झाले. महाराष्ट्राच्या राजकारणातील एक उत्तम राजकारणी, संघर्ष करून राजकारणात आलेले नेते म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनामुळे काँग्रेसची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे हे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही म्हटले आहे. असे सगळे असले तरीही मुख्यमंत्री होण्याचे पतंगराव कदम यांचे स्वप्न अपूर्णच राहिले आहे.

पलूस-कडेगाव या मतदारसंघातून पतंगराव कदम १९८५, १९९०, १९९९, २००४, २००९ आणि २०१४ अशा सहा वेळा निवडणुकांमध्ये जिंकले. या मतदारसंघाचे आमदार म्हणून २९ वर्षे त्यांची कारकीर्द होती. १९९९ च्या निवडणुकांच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस हा वेगळा पक्ष शरद पवारांनी स्थापन केला. त्यावेळी काँग्रेसमधले काही नेते शरद पवारांच्या पक्षात गेले. मात्र पतंगराव कदम यांनी काही काँग्रेस पक्ष सोडला नाही.

२००४ च्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची आघाडी झाली. त्यावेळी पतंगराव कदम एक लाखापेक्षा जास्त मताधिक्याने निवडून आले. एवढ्या मोठ्या फरकाने जिंकून आल्यावर मुख्यमंत्रीपदाची माळ त्यांच्याच गळ्यात पडणार असे वाटत होते. मात्र काँग्रेसने संधी दिली ती विलासराव देशमुख यांना आणि त्यावेळी त्यांचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले. त्या काळात ते सहकार मंत्री म्हणून सरकारमध्ये कार्यरत होते.

२००९ च्या विधानसभा निवडणुका झाल्या तेव्हा पतंगराव कदम ३५ हजारांपेक्षा जास्त मताधिक्याने निवडून आले. त्यावेळीही मुख्यमंत्री कोण होणार? यावर बरीच चर्चा रंगली होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात बैठकांचे सत्र सुरु होते. त्याही वेळी काही पतंगराव कदम यांचे नाव चर्चेत होते. मात्र मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी मिळाली ती अशोक चव्हाण यांना. अशोक चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात पतंगराव कदम यांना वन खाते आणि मदत व पुनर्वसन खात्याची जबाबदारी देण्यात आली. ही जबाबदारी त्यांनी फक्त घेतलीच असे नाही तर या खात्याला प्रतिष्ठाही मिळवून दिली. वन विभागातील रोजंदरीवर काम करणाऱ्या सात हजार कर्मचाऱ्यांना त्यांनी कायम केले. असे सगळे असले तरीही त्यांचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न वास्तवात उतरू शकले नाही. त्यांच्या जाण्याने काँग्रेसने एक वेगळी दृष्टी लाभलेला द्रष्टा नेता गमावला आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.