ज्येष्ठ काँग्रेस नेते पतंगराव कदम यांचे मुंबईतील लीलावती रूग्णालयात निधन झाले. आज दुपारी ४ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. अडचणींवर मात करून काँग्रेस पक्षात स्वतःचे स्थान निर्माण करणारे नेते अशी पतंगराव कदम यांची ख्याती होती. त्यांच्या जाण्याने काँग्रेस पक्षाचे नुकसान तर झाले आहेच पण महाराष्ट्राने एक चांगला राजकारणी गमावला आहे.

सांगली जिल्ह्यातील एका लहान शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी त्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या साधना महाविद्यालयात महिना ७० रुपये पगाराची नोकरी करायला सुरुवात केली आणि त्यांच्यातला राजकारणी आकार घेत गेला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक परिवर्तनासाठी पतंगराव कदम यांनी पावले उचलली आणि वाटेत येणाऱ्या अनेक अडचणींवर ते मात करत गेले. रयत शिक्षण संस्थेत महिना ७० रुपये पगाराची नोकरी करून आयुष्य सुरु करणारे पतंगराव कदम सध्याच्या घडीला १८४ संस्थांचे संचालक होते.

१९६८ मध्ये त्यांच्या सार्वजनिक आयुष्याची सुरुवात झाली. यशवंत राव मोरे आणि शंकरराव मोरे या दोघांनाही पतंगराव कदम गुरुस्थानी मानत. त्याआधी १९६४ मध्ये पुण्यातील कसबा पेठ भागात असलेल्या एका दहा बाय दहाच्या खोलीत त्यांनी भारती विद्यापीठाची स्थापना केली. या खोलीत एक जुने टेबल, एक खुर्ची आणि जुने कपाट इतकेच सामान होते. पुण्यातील अनेक वृत्तपत्रांनी एका बोळामध्ये स्थापन झालेले हे विद्यापीठ बोळातच विसर्जित होणार अशी टीकाही त्यावेळी केली. मात्र पतंगराव कदम यांनी ध्यास सोडला नाही. त्याचाच परिणाम म्हणून या विद्यापीठाने सुवर्ण महोत्सवी वर्षाचा टप्पा गाठला. तसेच १९९६ पासून या विद्यापीठाला अभिमत विद्यापीठाचा दर्जाही प्राप्त झाला. या विद्यापीठातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लाखांच्या घरात आहे. तर सेवकांची संख्या हजारांच्या घरात आहे. या विद्यापीठामुळे अनेकांना शिक्षण तर मिळालेच पण अनेकांच्या रोजगाराचाही प्रश्न सुटला.

काहीतरी वेगळे करण्याची उर्मी बाळगलेले पतंगराव कदम यांनी गावात चौथीपर्यंत शिक्षण घेतल्यावर कुंडल या ठिकाणी माध्यमिक शिक्षण घेतले. त्यानंतर ते पुण्यात आले. पुण्यात आल्यावर द्विपदवीधर झाले. शिक्षकही झाले. त्यांच्या नावापुढे डॉक्टरेटही लागली. शिक्षणाचा प्रसार सुरु होताच त्याच वेळी १९८० च्या सुमारास त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. काँग्रेस पक्षात जायचे हा त्यांचा विचार त्यावेळी पक्का झाला होता. मात्र या निवडणुकीत ते पराभूत झाले. सांगली जिल्ह्यात वसंतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस भरभक्कम होती, तेव्हा अपक्ष निवडणूक लढविण्याचे धाडसच आहे. पराभव झाला म्हणून खचून जाणारे ते पतंगराव कदम नव्हते. १९८५ मध्ये पुन्हा लढत दिली आणि आमदार झाले. तेव्हापासून १९९५ चा अपवाद वगळला तर सहावेळा निवडून आले. राजकारणात यशामागून यश मिळत असताना गावातली कामे करणे त्यांनी कधी सोडले नाही. १९९९ मध्ये उद्योग आणि जलसंधारण खात्याचे मंत्री म्हणून त्यांना संधी मिळाली. १९९९ ते २००३ या काळात विलासराव देशमुख आणि २००३-०४ या कालावधीत सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री होते. मात्र त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठीही पतंगराव कदम यांच्या नावाची चर्चा झाली होती. सहा वेळा आमदार म्हणून ते निवडून आले आणि १८ वर्षे ते मंत्री होते. वन खाते, उद्योग, मदत आणि पुनर्वसन अशी खाती त्यांनी सांभाळली. विद्यार्थी दशेपासून सुरु झालेल्या एका झंझावताची अखेर झाली आहे. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी ४ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राने एक उत्तम राजकारणी आणि एक चांगला शिक्षण प्रसारक गमावला आहे असे म्हटले तर मुळीच वावगे ठरणार नाही.