जिल्ह्यातील काँग्रेसच्या अधोगतीला माजी पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम यांची एकाधिकारशाही कारणीभूत असल्याचा गंभीर आरोप माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांनी गुरुवारी पत्रकार बैठकीत केला. इस्लामपूर येथे एकास एक उमेदवार देण्यात कदम यांनीच खो घातला असून कोणताही उमेदवार निश्चित करीत असताना कार्यकर्त्यांची बाजू ऐकून घेतली नाही. तसेच राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील हे सुद्धा इस्लामपुरातून अन्य मतदार संघात ढवळाढवळ करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
विधानसभा निवडणुकीमध्ये आपण इस्लामपूरमध्ये लक्ष घातले ते पक्ष वाढावा यासाठीच. याबाबत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी बोलूनच आपण एकास एक उमेदवार देण्याचा प्रयत्न करीत होतो. मात्र केवळ कदम यांच्यामुळे हे प्रयत्न अयशस्वी ठरले. मिरजेमध्ये सी.आर. सांगलीकर यांना उमेदवारी देण्याची वरिष्ठांनी मान्य केले होते. मात्र कदम यांनी स्वत:कडे देण्यात आलेल्या कोऱ्या एबी फॉर्मचा वापर करून ऐनवेळी सिद्धार्थ जाधव यांना उमेदवारी दिली. तसाच प्रकार तासगाव कवठे महांकाळमध्ये झाली. त्या ठिकाणी महादेव पाटील यांचा उमेदवारीचा दावा प्रबळ असताना सुरेश शेंडगे यांना उमेदवारी ऐनवेळी दिली. यामागे कदम यांची एकाधिकारशाहीच स्पष्ट होते.
सांगली येथे आपण मदन पाटील यांच्या पाठीशीच ठामपणे असून कोणत्याही स्थितीत या ठिकाणी काँग्रेसलाच विजयी करण्यासाठी प्रयत्न करणार असून अफवा पसरविण्याचे काम काही मंडळी जाणीवपूर्वक करीत आहेत. अपक्ष उमेदवार उभे करून काँग्रेसला मत विभागणीचा धोका उत्पन्न करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक होत असून हे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत. मुन्ना कुरणे यांना आपण पक्षाशी प्रामाणिक राहण्याचा सल्ला दिला होता असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, राष्ट्रवादीचे जयंत पाटील अन्य पक्षात ढवळाढवळ करीत असल्याचा आरोप प्रतीक पाटील यांनी केला. प्रत्येक वेळी दादा घराण्यात भांडणे लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. अंतर्गत कुरघोडय़ा करीत दादा घराणे संपविण्याचा प्रयत्न होत असून तो कदापि यशस्वी होणार नाही. लोकसभेमध्ये झालेल्या पराभवाला मोदी लाट कारणीभूत होती. त्यामुळे त्याचे श्रेय जयंत पाटील यांना देणे उचित वाटत नाही.
महापालिका निवडणुकीमध्ये सर्वानी मिळून मदन पाटील यांच्या पाठीशी ठामपणे राहण्याचा निर्णय झाला होता. यामुळेच महापालिकेत काँग्रेसला सत्ता मिळाली. सिद्धेवाडी आणि वाघोली एमआयडीसीला आपला वैयक्तिक विरोध नव्हता तर, तेथील जनतेला विश्वासात घ्यायला हवे अशी भूमिका आपण खासदार म्हणून घेतली होती. अंतर्गत कुरघोडय़ा करणारे जे पेरतील तेच उगवणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.