11 December 2018

News Flash

‘पतंजली’च्या अन्नप्रक्रिया उद्योगात हेटीकुंडी केंद्राची भर

२०१२ साली या केंद्राला पुन्हा सक्षम करण्याचा निर्णय झाला.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

बाबा रामदेव यांच्या ‘पतंजली’च्या अन्नप्रक्रिया उद्योगाच्या विदर्भातील नियोजित साम्राज्यात आता शासनाच्या कारंजा तालुक्यातील हेटीकुंडी गौळाऊ प्रकल्पाची भर पडण्याची चिन्हे आहे. २५ हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प साकारण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भूमिका महत्त्वपूर्ण असेल.

ब्रिटिशांनी १९४६ साली स्थापन केलेले व सध्या राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाचा ताबा असलेले हेटीकुंडी गौळाऊ केंद्र हे देशातील एकमेव असे केंद्र आहे. पुराणात उल्लेख झालेल्या व वर्धा जिल्हय़ाची ओळख असणाऱ्या गौळाऊ गाईचे संगोपन व संवर्धन या ठिकाणी होते. सध्या ११३ गौळाऊ जनावरे शिल्लक असून निधीअभावी हे केंद्र आता आचके देत आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हे केंद्र पतंजली उद्योग समूहाच्या स्वाधीन करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. ८०० एकर जमिनीवर राज्य शासनाने २५ हजार कोटी रुपयांचा निधी जमा करीत प्रकल्प उभा करावा. त्याची पुढील अंमलबजावणी पतंजली समूहामार्फत करावी, अशी सूचना गडकरींनी केल्याचे समजते. या जागेवर पतंजली १० हजार गायींची खरेदी करीत संवर्धन केंद्र, डेअरी व तत्सम उपक्रम सुरू करेल, असे गडकरी नागपुरात म्हणाले.

या संदर्भात नवा काही प्रस्ताव आल्याची माहिती नाही. २००५ साली हे केंद्र टप्प्या टप्प्याने बंद करण्याचा निर्णय झाला होता. परंतु त्यावेळी आमदार अमर काळे यांनी हस्तक्षेप केल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी स्थगिती दिली.

२०१२ साली या केंद्राला पुन्हा सक्षम करण्याचा निर्णय झाला. पण पदभरती झालेली नव्हती. दोन वर्षांपूर्वी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रासाठी १८ कोटी रुपये मंजूर करण्याची घोषणा केली. मात्र, ते प्राप्त झाले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आर्वी दौऱ्यावर आले असताना पशुसंवर्धन आयुक्तांनी ही बाब त्यांच्या पुढे उपस्थित केली. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी हा निधी मंत्रिमंडळाच्या मंजुरी अभावी मिळाला नसल्याची शक्यता वर्तवित त्वरित हा प्रस्ताव बैठकीत ठेवण्याची सूचना केली. मात्र, अद्याप हा पैसा मिळालेला नाही. त्यातच केंद्राचे काम ‘आऊटसोर्स’ करण्याचा विचार सुरू झाला.

गडकरींनी हे केंद्र हस्तांतरित करण्याची मुख्यमंत्र्यांना केलेली विनंती आता या पैलूने पाहिल्या जाते. गौळाऊच्या देशी वाणाचे काय, हा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित करण्यात येतो. आयुर्वेद उपचारात गौळाऊच्या तुपाला प्रथम प्राधान्य दिले जाते. हजार ते बाराशे रुपये किलोने विकल्या जाणाऱ्या या तुपाची मागणी सर्वत्र होते. पतंजलीच्या ‘आक्रमणा’नंतर गौळाऊची ओळख टिकणार काय, असा पशुपालकांचा सवाल आहे.

केंद्राकडे ३२८ हेक्टर जमीन होती. वनविभागास काही जमीन सुपूर्द केल्यानंतर केंद्राकडे ४० हेक्टर जमीन शिल्लक आहे. अद्याप गौळाऊचे प्रजनन व संवर्धनाचे काम या ठिकाणी होत आहे. चांगल्या वंशाचे वळू आणले जात आहेत. अत्यंत उच्च प्रतीच्या म्हटल्या जाणाऱ्या व दुर्मीळ होत चाललेल्या गौळाऊ गायींसाठी हे केंद्र मोठा आधार आहे.  – डॉ. सतीश राजू संचालक, पशुसंवर्धन-मदरडेअरी प्रकल्प, हेटीकुंडी प्रकल्प

First Published on November 15, 2017 1:23 am

Web Title: patanjali ayurved company project now in vidarbha