वारणानगर (ता. पन्हाळा) येथे आयोजित केलेल्या वारणा केसरी कुस्ती मदानात ‘जनसुराज्य शक्ती केसरी’साठी झालेली भारत केसरी रोहित पटेल विरुद्ध पंजाब केसरी गुरुसाहेबसिंग साबा यांच्यातील कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली. प्रथम क्रमांकाची एक तासाची झुंज होऊनही कुस्ती निकाली झाली नसल्याने शौकिनांची निराशा झाली. सहकारमहर्षी स्वर्गीय तात्यासाहेब कोरे यांच्या २० व्या पुण्यस्मरणदिन व जन्मशताब्दी वर्षांनिमित्त कुस्ती मदानाचे आयोजन करण्यात आले होते.
गेली १४ वष्रे वारणेचे मदान पटेलने गाजवले आहे. साबाशी तो कसा भिडतो याकडे शौकिनांच्या नजरा लागल्या होत्या. चिवट गुरुसाहेबसिंग साबाने प्रथमपासूनच अत्यंत चिवट झुंज दिली. तब्बल ५७ मिनिटे कुस्ती झाली. साबाने रोहितला लपेट लावण्याचा वारंवार प्रयत्न सुरू ठेवला. २३ व्या मिनिटाला रोहितने साबाच्या कक्षेतून सुटका केली. ३२ व्या मिनिटाला साबाने पुन्हा रोहितवर ताबा घेतला. रोहितनेही साबाला पाचवेळा धोबीपछाडचा प्रयत्न केला. ४० मिनिटानंतर शेवटची १० मिनिटे वेळ देण्यात आली, तरीही कुस्ती निकाली न झाल्याने शेवटी कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली.
खन्ना आखाडय़ाचा रूबलसिंह व पंजाबचा हरकेश छोटा खली यांच्यातील दुसऱ्या क्रमांकासाठीची वारणा साखर कुस्तीही चटकदार झाली. दोन्ही मल्लात बराचवेळ गर्दनखेच सुरू राहिली. अखेर २७ व्या मिनिटाला रूबलसिंहने गुणांवर विजय मिळवला. तिसऱ्या क्रमांकासाठी तात्यासाहेब कोरे दूध साखर वाहतूक केसरी किताबासाठी शाहू कुस्ती केंद्राच्या समाधान घोडकेने घिस्सा डावावर जागतिक पोलीस सुवर्णपदक विजेत्या मनजितला चितपट करून हा किताब पटकावला.
‘वारणा दूध कामगार संघटना केसरी’ किताबासाठी झालेल्या लढतीतही न्यू मोतिबागच्या मारुती जाधवने शाहूपुरी तालमीच्या संतोष दोरवडला चितपट करून ‘वारणा दूध कामगार संघटना केसरी’ किताब पटकाविला. वारणा विभाग शिक्षण मंडळ केसरीसाठी गंगावेशचा कांतीलाल जाधव विरुद्ध मोतीबाग तालमीचा महेश वरुटे यांच्यात सुरुवातीपासून चुरशीची कुस्ती होऊन गंगावेशच्या कांतीलाल जाधवने महेश वरुटेवर विजय मिळवून ‘वारणा शिक्षण मंडळ केसरी’ किताब पटकाविला. वारणा बिलटय़ूब इंडस्ट्रीज केसरी किताबासाठी झालेल्या लढतीत गंगावेश तालीमच्या योगेश बोंबाळे याने पुण्याच्या साईनाथ रानवडेवर विजय मिळविला.