नगर : पाथर्डी तालुक्यातील जवखेड खालसा येथील सरगड वस्तीवर वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबटय़ा काल, रविवारी रात्री जेरबंद झाला. आज, सोमवारी वनविभागाच्या पथकाने या बिबटय़ाला माळशेज घाटात मुक्त केले. गेल्या चार महिन्यातच पाथर्डी तालुक्यात वन विभागाने चार  बिबटे पकडले आहेत.

जवखेड खालसा गावात गेल्या शुक्रवारी बिबटय़ाने एका शेळीचा फडशा पाडला होता. यानंतर ग्रामस्थांनी या ठिकाणी पिंजरा लावावा अशी मागणी वनविभागाकडे केली. त्यानुसार वनविभागाने तातडीने या ठिकाणी पिंजरा लावला होता. रविवारी रात्री आठच्या सुमारास बिबटय़ा परत एकदा सरगड वस्तीवर आला व अलगदपणे पिंजऱ्यात अडकला. त्याच्या ओरडण्याने ग्रामस्थांना बिबटय़ा जेरबंद झाल्याचे समजले.

त्यांनी तातडीने ही माहिती वनविभागाला दिल्यानंतर तिसगाव विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी दादासाहेब वाघूलकर, वनपाल वैभव गाढवे, वनरक्षक कविता दहिफळे, विष्णू मरकड, कानिफ वांढेकर, गणेश पाखरे हे सरगड वस्तीवर गेले व त्यांनी या बिबटय़ाला ताब्यात घेत आज माळशेज घाटात सोडून दिले. जवखेड  खालसा येथे बिबटय़ाचा वावर असल्याचे लक्षात येताच गावात भीतीचे सावट निर्माण झाले होते, मात्र बिबटय़ा जेरबंद झाल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.