राज्यामधील उद्योगधंदे आणि लॉकडाउनसंदर्भात संयमाने निर्णय घेणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे. यावेळी बोलताना त्यांनी संयम आणि यम यापैकी एक गोष्ट निवडावी लागेल असा टोला लॉकडाउनवरुन टीका करणाऱ्यांना उत्तर देताना लगावला आहे. राज्यामधील आर्थिक परिस्थितीवर भाष्य करताना अनेक ठिकाणी उद्योगधंद्यांना परवानगी देण्यात आली आहे असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. मात्र हे करत असतानाच योग्य विचार करुन निर्णय घेणं गरजेचं असल्याचं सांगताना यांनी यम आणि संयम यासंदर्भातील वक्तव्य केलं. शिवसेनेचे खासदार आणि ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांची विशेष मुलाखत घेतली. याच मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी लॉकडाउन उठवण्याचा निर्णय टप्प्या टप्प्यांमध्ये घेतला जाईल हे पुन्हा अधोरेखित केलं.

राज्यामधील उद्योगधंदे पुन्हा सुरु करताना संयमाने परिस्थितीकडे पाहणे गरजेचे असल्याचे उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख करत सांगितलं. “संयम या शब्दाची एक गंमत आहे. म्हणजे शिवसेनाप्रमुख म्हणायचे की अक्षर अक्षर जुळवून शब्द बनतो आणि त्या शब्दाचे मंत्र होतात. म्हणजे शब्दाची ओवी पण होते आणि शिवी पण होते. म्हणजे आता जसा संयम हा शब्द आहे. यामधला ‘स’ काढला तर या होतो. तर यम होतो. त्यामुळे संयम हवा की यम हे तुम्ही ठरवा,” असा टोला लॉकडाउनला विरोध करणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी लगावाला.

नक्की वाचा >> ‘राज्यातील अनेक शहरांमध्ये पुन्हा पुन्हा लॉकडाउन का करावं लागत आहे?’; मुख्यमंत्र्यांनी दिलं उत्तर

“माझ्यात आत्मविश्वास आहे आणि मी…”

“तुम्ही कशाला आमंत्रण द्यायचे हे स्वत: ठरवात. म्हणजे संयम ठेवायचा की यम पाहिजे असं आहे हे. मी उगच यमक जुळवण्यासाठी हे सांगत नाहीय,” असंही पुढे उद्धव यांनी सांगितलं. त्यावर बोलताना संजय राऊत यांनी, “उद्धव ठाकरे म्हणजे संयम हे देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील समिकरण आहे,” असं म्हटलं. त्यावर उत्तर देता उद्धव यांनी, “माझ्यात आत्मविश्वास आहे आणि मी ते करुन दाखवलं आहे,” असं वक्तव्य केलं.

राज्यामध्ये ५० हजार उद्योगधंदे सुरु

राज्यातील अनेक भागांमध्ये उद्योगधंदे सुरु करण्यास परवानगी देण्यात आल्याचेही उद्धव ठाकरेंनी यावेळेस स्पष्ट केलं. मात्र दाट लोकवस्ती असणाऱ्या ठिकाणी प्रादुर्भाव अधिक असल्याने त्याबद्दलचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल असं मुख्यमंत्री म्हणाले. “राज्यामध्ये जवळजवळ ५० हजाराच्या आसपास उद्योगधंदे सुरु झाले आहेत. बाकीही उद्योगधंदे लवकरच सुरु होणार आहेत. मात्र मुंबई, पुणे जो पट्टा आहे तिथे प्रादुर्भाव जास्त आहे. यामागील कारण म्हणजे येथील लोकवस्ती अधिक आहे. अधिक लोकवस्ती असल्याने मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. तिथे लॉकडाउन असून हा सर्व भाग औद्योगिक पट्टा आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. पण महाराष्ट्रामधील इतर भागांमध्ये जेव्हा ग्रीन, ऑरेंज आणि रेड असे झोन केले तेव्हाच उद्योगधंद्यांना परवानगी देण्यात आली आहे. मे महिन्याच्या शेवटी यासंदर्भातील परवानग्या देण्यात आल्या. आता यामध्ये ऑरेंज झोन म्हणजे एखाद्या जिल्ह्यात ठराविक भागामध्ये प्रादुर्भाव आहे आणि आजूबाजूला सर्व काही व्यवस्थित आहे तर आपण अशा ठिकाणी उद्योगधंदे सुरु करण्यास मुभा दिली. ग्रीन झोनमध्येही उद्योगधंदे सुरु झाले आहेत,” अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिली.

नक्की वाचा >> “तेव्हा मोदींनी सांगितलं होतं की, अशी योजना जाहीर करु नका ज्यामुळे…”; उद्धव ठाकरेंचा खुलासा

“सर्वजण अनुभवामधून शिकलो”

राज्यातील परिस्थितीबद्दल बोलताना उद्धव यांनी अनुभवातून शहाणपण आल्याचे सांगितले. “आता जे आपले साथी सोबती आहेत महाविकासआघाडीमध्ये, पवार साहेब, सोनियाजींबरोबरच काँग्रेसची इथलं लोक असतील या सर्वांना आता अनुभवामधून शहाणपण आलं आहे. तेच शहाणपण आता सरकार आपल्या कामात दाखवत आहे. एकूणच मागे वळून बघताना आपल्याकडून काय राहून गेलं हे पाहताना मी सरकार म्हणून पाहतो. तेव्हा मी पक्षांची झापडं लावत नाही. सरकार हे सरकार असतं. या सरकारकडून काय झालं होतं, काय राहिलं होतं याचा सर्वाचा एक आढावा घेऊन आपण हे सर्व करतो आहोत,” असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.