नीरज राऊत

वैद्यकीय अधिकारी, प्रशिक्षित कर्मचारी उपलब्ध नसल्याने अडचणी

पालघर : जिल्ह्यच्या ग्रामीण भागात अनेक करोना काळजी केंद्रांना करोना उपचार केंद्रांमध्ये (डीसीएचसी) रूपांतरित करण्यात आले आहे.  परंतु या केंद्रात  वैद्यकीय अधिकारी, प्रशिक्षित कर्मचारी उपलब्ध नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत.   रुग्णांच्या नातेवाईकांनाही उद्भवणाऱ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

पालघर ग्रामीण रुग्णालयालगत आरोग्य पथकाच्या इमारतीमध्ये ५० प्राणवायू खाटांचे करोना आरोग्य केंद्र कार्यरत करण्यात आले आहे. या खेरीज वाणगाव, मोखाडा, वाडा तसेच डहाणू तालुक्यात देखील करोना आरोग्य केंद्रांची क्षमता वाढविण्यात आली.  परंतु येथील रुग्णांवर उपचार करण्यासाठी पुरेसे वैद्यकीय अधिकारी व परिचारिका तसेच देखभाल करण्यासाठी चतुर्थ श्रेणी कर्मचारी उपलब्ध नाहीत.

वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता असल्याने प्रशिक्षणार्थी डॉक्टर्स   किंवा हंगामी पद्धतीने घेतलेल्या डॉक्टरांवर रुग्ण कक्षाची जबाबदारी सोपवण्यात येते. परंतु त्यांना करोना रुग्णांवर उपचाराबाबत प्रशिक्षण, गंभीर रुग्ण कसे हाताळावे याचे कौशल्य नसल्याने समस्या निर्माण होतात.  त्यामुळे  एखाद्या रुग्णाला प्राणवायू पातळी कमी झाल्यास कक्षातील  अधिकाऱ्यांवर अशा रुग्णाच्या नातेवाईकांना उपचार केंद्रात  बोलावण्याची वेळ  येते आणि त्यांना गंभीर रुग्णाला अतिदक्षता विभागात उपचाराची गरज असल्याचे सांगून त्यांना इतरत्र हलवण्यासाठी आग्रह केला जातो.  सद्य:स्थितीत शासकीय व खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात खाट मिळविणे कठीण असल्याने रुग्णाचे नातेवाईक घाबरून जातात, अशी परिस्थिती निर्माण होते.

प्राणवायूच्या मदतीने उपचार घेत असताना रुग्णांना प्रात:विधीला जावयाचे असल्यास किंवा जेवण करावयाचे असल्यास मदतीसाठी पुरेशा प्रमाणात चतुर्थश्रेणी कर्मचारी किंवा मदतीस देखील उपलब्ध नाहीत. त्यामुळे  गंभीर रुग्णाला स्वत:च ही कामे करावी लागतात. अशा अनेक प्रसंगात रुग्ण  प्राणवायूच्या कमतरतेमुळे गंभीर झाल्याच्या घटना घडल्याची माहिती देण्यात येते.

शौचालय आणि कक्षातील स्वच्छता, रुग्णांच्या खाटांवरील चादरी बदलणे किंवा तत्सम कामांसाठी मनुष्यबळाची कमतरता आहे.  त्यामुळे करोना उपचार केंद्र व समर्पित करोना रुगालयांमधील  आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे.

प्राणवायू खाटा उपलब्ध करण्यात आल्या असल्या तरी प्राणवायूचे प्रमाण समजण्यासाठी लागणारे फ्लोमीटर व इतर तांत्रिक साम्री सहजासहजी उपलब्ध होत नसल्याने उपचार करताना तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. काही केंद्रांमध्ये नव्याने हंगामी पद्धतीने मनुष्यबळाची भरती होत असली तरीसुद्धा   प्रशिक्षण नसल्याने  मनावर परिणाम होऊन अनेक  कर्मचारी सोडून गेल्याचे प्रकार झाले आहेत. त्यामुळे रुग्णांसह नव्याने भरती होणाऱ्या वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, चतुर्थश्रेणी कर्मचारी व मदतनीस यांना मानसोपचारतज्ज्ञांच्या मार्फत प्रशिक्षण व समुपदेशन करण्याची गरज असल्याचे काही उपचार केंद्रप्रमुख यांचे म्हणणे आहे.

जिल्ह्यत विविध ठिकाणी असलेल्या तज्ज्ञ वैद्यकीय मंडळींना  जिल्हा प्रशासनाने अधिग्रहित करून त्यांना करोना केंद्रांमध्ये सेवा देण्यास सांगितल्यास  गंभीर रुग्णांवर उपचार करणे अधिक सोयीचे होईल, असे जिल्ह्यतील काही करोना केंद्रातील प्रमुखांनी ‘लोकसत्ता’ ला सांगितले.

गंभीर रुग्णांना द्रव आहार

गंभीर  रुग्णांना प्राणवायू लावण्यात येत असून अशा रुग्णांना जेवणासाठी किंवा प्रात:विधीसाठी जाताना प्राणवायू यंत्रणा काढावी लागते. त्याचा त्रास त्यांना सहन करावा लागतो. त्याचप्रमाणे रुग्णालयात एकाच प्रकारचे जेवण येत असते. परंतु ते सर्वच रुग्णांसाठी फलदायी असते असे नाही. प्राणवायूवर असणाऱ्या तसेच गंभीर रुग्णांना इतर सर्वसाधारण रुग्णांना देण्यात येणाऱ्या जेवणाऐवजी द्रव रूपातील (लिक्विड डायट) आहार देण्यात आल्यास तसेच गंभीर रुग्णांना डायपर, कॅथ्रेडेल युरिन संच लावले गेल्यास रुग्णांची देखभाल करणे सोयीचे होईल, असे अतिदक्षता रुग्णांची देखभाल करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सुचविण्यात आले आहे. खासगी रुग्णालयात याच पद्धतीने गंभीर रुग्णांचे व्यवस्थापन केले जात असून शासकीय करोना उपचार केंद्राने त्याचे अनुकरण करण्याची गरज आहे.

वेतनाबाबत नाराजी

मुंबई-ठाणे महानगरपालिका क्षेत्रात शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये वैद्यकीय क्षेत्रातील अधिकारी कर्मचाऱ्यांना मोठय़ा प्रमाणात वेतन देण्यात येते असल्यामुळे तसेच जिल्ह्यकडे निधीची मर्यादा असल्याने तुलनात्मक कमी वेतनावर काम करण्यास जिल्ह्यतील शासकीय करोना रुग्णालयात अधिकारी- कर्मचारी काम करण्यास तयार  नाहीत. यामुळे जिल्ह्यत मोठय़ा प्रमाणात मनुष्यबळाची कमतरता भासत आहे.

मदत केंद्राची गरज

शासकीय रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची सद्य:स्थिती व प्रगती संदर्भात माहिती देण्यासाठी रुग्णालयाबाहेर मदत व माहिती केंद्राची उभारणी प्रत्येक करोना उपचार केंद्र व समर्पित करोना रुग्णालयाने करावी, अशी मागणी रुग्णांच्या नातेवाइकांकडून करण्यात येत आहे.