अवयवदानाची चळवळ हळूहळू वाढत चालली असताना त्यास सोलापुरातही सकारात्मक प्रतिसाद मिळतो आहे. बुधवारी अवयवदानाच्या आगळ्या वेगळ्या प्रकारात यशोधरा रुग्णालयात मेंदूमृत झालेल्या सतीश नामदेव पलगंटी (वय ४०) यांची दोन्ही मूत्रपिंडे दोन सख्या बहिणींच्या शरीरात प्रत्यारोपित करण्यात यश आले.

अलीकडच्या काळात अवयवदानासाठी सोलापुरात सातव्यांदा ‘ग्रीन कॉरिडॉर’ राबविण्यात आले आहे. यशोधरा रुग्णालयात झालेल्या बुधवारच्या अवयवदानामुळे या क्षेत्रात चालू वर्षांत सोलापूरचा पुणे विभागात दुसरा क्रमांक आला आहे. नाशिक व कोल्हापूरला सोलापूरने मागे टाकले आहे. सतीश पलगंटी यांच्या दोन मूत्रपिंडांसोबत यकृतही दान करण्यात आले असून ते सोलापूर-पुणे मार्गावर ग्रीन कॉरिडॉर निर्माण करून पुण्याच्या रूबी हॉल रुग्णालयात नेऊन तेथील एका गरजू रुग्णाला बसविण्यात आले आहे.

सतीश पलगंटी हे व्यवसायाने इलेक्ट्रिशियन होते. त्यांना चार  वर्षांपासून रक्तदाब होता. गेल्या ११ मार्च रोजी रक्तदाब जास्त वाढल्याने त्यांना मरकडेय सोलापूर सहकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नंतर त्यांना यशोधरा रुग्णालयात हलविले असता मेंदूत मोठय़ा प्रमाणात रक्तस्त्राव होऊन त्यांचा मेंदू मृत झाल्याचे घोषित केले गेले. याच रुग्णालयातील अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास येमूल हे पलगंटी यांचे नातेवाईक आहेत. त्यांनी पलगंटी यांच्या इतर नातेवाईकांना अवयवदानाबाबत मााहिती दिली. पलगंटी यांच्या शिक्षकपत्नी कल्पना व बंधू राजेश यांनी दु:खद अवस्थेतही अवयवदानाचा निर्णय घेतला. त्यानुसार अवयवदानाबाबतची माहिती राज्यस्तरीय समितीला कळविण्यात आली. अवयव हवे असलेल्या प्रतीक्षा यादीत सोलापूरच्या याच यशोधरा रुग्णालयातील दोघा सख्या बहिणींची नावे अग्रक्रमावर होती. त्यामुळे पलगंटी यांची दोन मूत्रपिंडे या दोन्ही सख्या बहिणींना मिळाली. या दोन्ही बहिणी मूत्रपिंडाच्या त्रासामुळे गेल्या दहा वर्षांपासून डायलिसिसवर उपचार घेत होत्या. डॉ. हेमंत देशपांडे, डॉ. विजय शिवपुजे, डॉ. नीलरोहित पैके, डॉ. संजय गायकवाड, डॉ. विठ्ठल कृष्णा, डॉ. शेहरोज बॉम्बेवाला आदींच्या पथकाने अवयवदानाची प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली.