प्रबोध देशपांडे / मोहन अटाळकर

राज्यात गेल्या आठवडय़ापासून स्थानिक पातळीवर एकापाठोपाठ एक निर्बंध लागू करण्याचे आदेश काढण्यात आले. रुग्णसंख्येबाबत विचित्र ताळमेळ लावत जाहीर करण्यात आलेल्या नव्या कठोर टाळेबंदीचा प्रयोग कितपत यशस्वी ठरेल, हे अनुत्तरित आहे. सर्वसामान्यांच्या जगण्याला आणि एकूण आर्थिक घडीला बिघडविणाऱ्या ‘स्थानिक स्वराज्य संस्थानिकां’च्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध भागांचा आढावा घेणारी मालिका..

आपत्ती व्यवस्थापन व साथरोग प्रतिबंधात्मक कायद्याच्या कठोर अंमलबजावणीकडे झालेले दुर्लक्ष, विविध सरकारी यंत्रणांमधील समन्वयाचा अभाव, गर्दी टाळण्यासाठी पोलीस यंत्रणेला प्रभावी योजना आखण्यात आलेले अपयश आणि बाधितांना तातडीने रुग्णालयात हलवण्यातील विलंबामुळेच अकोला आणि अमरावतीत करोनाचा प्रसार वाढत आहे.

अकोला आणि अमरावतीमध्ये लोकसंख्येच्या तुलनेत पुरेशा तपासण्या नाहीत, चाचण्यांचे अहवाल कित्येक दिवस प्रलंबित राहत आहेत. शासकीय रुग्णालयांमध्ये तज्ज्ञ डॉक्टर व मनुष्यबळाचा अभाव असून जाहीर करण्यात आलेल्या कठोर संचारबंदीला जनतेनेच नाकारले आहे.

नवीन बाधित आढळताच त्याच्या संपर्कातील व्यक्तींची तातडीने माहिती मिळवण्याच्या यंत्रणेत दोष आहे. त्यामुळे येथे जोखमीतील व्यक्तींना सक्तीने विलगीकरणात घेतले जात नाही, त्यांची वेळेत चाचणी होत नाही.  काही बाधित व्यक्ती विलगीकरणाच्या भीतीने पसार होतात. त्यामुळे करोनाचा संसर्ग झालेला रुग्ण गंभीर अवस्थेतच रुग्णालयात दाखल होतो. विस्कळीत व्यवस्थापनामुळेच दोन्ही जिल्ह्य़ांत मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. अमरावती जिल्ह्य़ात ८ जुलैपर्यंत झालेल्या एकूण २८ करोना मृत्यूंपैकी १४ जण तर अकोल्यात दगावलेल्या ९१ पैकी जवळपास १७ जण अतिगंभीर अवस्थेतच रुग्णालयात पोहचले. हे यंत्रणेचे अपयशच म्हणावे लागेल.

अकोला शहरासह ग्रामीण भागातही करोना फैलावला. दररोज सरासरी एक मृत्यू व २० रुग्णांची नोंद झाली. करोनाशी लढणारी आरोग्य यंत्रणाच अक्षम असल्याने परिस्थिती हाताबाहेर जाऊन अनियंत्रित झाली. करोना व मृत्यू रोखण्यासाठी करण्यात आलेल्या सर्व उपाययोजना निष्फळ ठरल्या आहेत.

व्यवस्थापन  कोलमडले..

अमरावतीत आरोग्य, पोलीस यंत्रणा आणि महापालिकेव्यतिरिक्त इतर सहाय्यभूत ठरू शकणाऱ्या विभागांना परिस्थिती हाताळण्यासाठी एकत्र केले गेले नाही. पोलिसांनी सुरुवातीला गर्दी रोखण्यासाठी कडक पावले उचलली, पण नंतर मोकळीक दिली गेली. परिणामी लोकांमधील संचारबंदीविषयीचे गांभीर्य  कमी होत गेले. अपुऱ्या यंत्रणेत दंडात्मक कारवाईलाही मर्यादा आल्या. अमरावतीत सुपर स्पेशालिटीतील कोविड रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय आणि पीडीएमसी या ठिकाणी करोनाबाधितांसाठी सुमारे ४८० खाटा उपलब्ध आहेत. सद्यस्थितीत त्या पुरेशा असल्या तरी, भविष्यात अतिरिक्त तरतूद करावी लागणार आहे.

करोनाची परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे पूर्ण प्रयत्न सुरू आहेत. यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहे. अकोल्यात व्हेंटिलेटर आल्यावर ते अनेक दिवस कार्यान्वित न होण्याचा प्रकार गंभीर घडला आहे. या प्रकरणाचा आढावा घेऊन ते सुरू करण्यात येतील.

– संजय धोत्रे, केंद्रीय राज्यमंत्री.

अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये ‘अँटिजेन टेस्टिंग’ सुरू करण्यात आले आहे. सरकारच्या दिशानिर्देशांप्रमाणे स्थानिक पातळीवर उपाययोजना व निर्बंध लागू करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहेत. अमरावतीत दर शनिवारी आणि रविवारी संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. विविध पातळ्यांवर उपाययोजना आखल्या जात आहेत.

– पीयूष सिंह, विभागीय आयुक्त, अमरावती.

परिस्थिती काय?

९ जुलै २०२० (दुपारी ३ वाजेपर्यंत)

जिल्हा        एकूण रुग्ण     मृत्यू    करोनामुक्त

अकोला     १,८२२      ९१      १,३४४

अमरावती      ७५५      २८          ५१९

समस्याच अधिक..

* अकोल्यात सध्या केवळ १७ व्हेंटिलेटर असून बऱ्याच बाधितांना प्रतीक्षेत राहावे लागते. आता केंद्राकडून ३६ व्हेंटिलेटर उपलब्ध झाले असले तरी ते कार्यान्वित झाले नाहीत.

* पदमंजुरीअभावी सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे घोडे अडलेले आहे. पदांअभावी या रुग्णालयाची टोलेजंग इमारत केवळ शोभेची वास्तू ठरत आहे.

* सर्वोपचार रुग्णालय व कोविड केंद्रात असुविधा व समस्यांचा डोंगर कायम आहेच.

* राजकीय उदासीनता व प्रशासकीय पातळीवरील इच्छाशक्तीच्या अभावाने अकोल्यात करोनाचे संकट गंभीर होत आहे.