आयुर्वेद महाविद्यालयाची तपासणी करण्यास आलेल्या केंद्रीय चिकित्सा समितीच्या डोळ्यात धूळ टाकण्यासाठी चक्क पसे देऊन मजुरांना दाखल करण्यात आले! प्रत्येकी ५०० रुपये मजुरीचे आमिष दाखवून ९ मजुरांना दवाखान्यातील खाटांवर झोपविले गेले खरे; मात्र, कमी ‘मजुरी’ दिल्यामुळे या मजुरांनी कांगावा केला. त्यामुळेच ही बनवेगिरी चव्हाटय़ावर आली.
उस्मानाबादेतील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातील विविध विभागांची तपासणी करण्यासाठी नवी दिल्लीहून केंद्रीय चिकित्सा समिती बुधवारी आली होती. समितीला आपले काम अधिक स्पष्ट दिसावे, या साठी एका विभागाच्या तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्याने चक्क मजुरीने रुग्ण दवाखान्यात दाखल केले. प्रत्येक रुग्णास ५०० रुपये मजुरी ठरली. त्यासाठी शहरातील ताजमहाल थिएटरसमोर दररोज कामाच्या शोधात येऊन थांबणाऱ्या सुखदेव जाधाव, शेषेराव चव्हाण, सुमन राठोड, चतुराबाई चौरे, शेवंताबाई राठोड, रुक्मिणी गायकवाड, संजय राठोड यांच्यासह अन्य दोघांना दवाखान्यातील खाटांवर मजुरीचे आमिष दाखवून बळजबरीने झोपविले. ठरलेल्या मजुरीपेक्षा कमी रक्कम वैद्यकीय अधिकाऱ्याने हातावर टेकविल्यामुळे मजुरांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. हा प्रकार मनसेचे शहराध्यक्ष दादा कांबळे यांना समजताच त्यांनी माध्यमांपर्यंत मजुरांची रुग्णालयातील सर्व कागदपत्रे व तेथे केलेल्या स्टिंग ऑपरेशनचे चित्रीकरण पोहोचविले.
आम्हाला मजुरीशी मतलब – राठोड
घाटंग्री तांडय़ावरील राठोड नावाच्या मजुराला या बाबत विचारले असता, ‘साहेब, काम काहीही असो, आम्हाला मजुरीशी मतलब,’ अशा शब्दांत प्रतिक्रिया देत वस्तुस्थिती सांगितली. सकाळी नऊच्या सुमारास पुलावर आम्ही सर्वजण थांबलो होतो. गवत काढण्यासाठी आणि मुरूम टाकण्यासाठी मजुरीने येता काय? असे विचारल्यानंतर ४ महिला व ५ पुरूष असे ९ जण दवाखान्यात आलो. आल्यानंतर आम्हाला काम सांगण्याऐवजी थेट एका खोलीत खाटांवर नेऊन बसविले. दोन तासानंतर तीन-तीनशे रुपये हातावर ठेवून काम संपले, आता तुम्ही जाऊ शकता, असे म्हणून घरी जाण्यास सांगितले. आम्हाला काय, मजुरीशी मतलब!
दिवस खड्डय़ात गेला – रुक्मिणी गायकवाड
रोज आम्ही कांक्रीटची कामे करतो. हात-पाय बघा, लगेच लक्षात येईल. काम आहे म्हणून पुलावरून घेऊन आले आणि हातात कागद देऊन खाटांवर बसविले. दोन तासाने तीनशे रुपये हातात ठेवले. ठरले होते ५०० रुपये आणि दिले ३००. दिवस खड्डय़ात गेला अन् मजुरी फक्त ३०० मिळाली, अशी प्रतिक्रिया रुक्मिणी गायकवाड या मजूर महिलेने दिली.