रुग्णांच्या सत्याग्रहात मन सुन्न करणारे अनुभव

नागपूर : कचरा वेचून पोट भरणारी आई आजारी पडली. मेंदूच्या शस्त्रक्रियेसाठी मध्यरात्रीच डॉक्टरांनीं अडीच लाख रुपये भरायला लावले. शस्त्रक्रिया करा दुसऱ्या दिवशी पैसे देतो म्हणून सांगितले, परंतु डॉक्टरांनी ऐकले नाही. शेवटी घरून ५० हजार रुपये आणले. डॉक्टरांनी आणखी २० हजारांशिवाय उपचारास नकार दिला. ते पैसे जमवायला उशीर झाला. परिणामी, शस्त्रक्रियाही विलंबाने सुरू झाली. अखेर आई गेली. डॉक्टरांनी केवळ २० हजारांसाठी आईला मरू दिले, या वेदना आहेत पुणे येथील संतोष दाभाडे याच्या. जन आरोग्य अभियानाच्या मदतीने यशवंत स्टेडियम येथे आयोजित रुग्णांच्या सत्याग्रहात संतोषसारख्याच अनेक पीडितांनी मन सुन्न करणारे अनुभव कथन केले. रुग्णांची शासकीय रुग्णालयांत होणारी फरफट, खासगी रुग्णालयांतील अवास्तव शुल्कातून होणारी लूट, धर्मादाय रुग्णालयांकडून नाकारला जाणारा उपचार, पैशांअभावी झालेले मृत्यू यासारख्या अनेक विषयांवर या रुग्णांनी लक्ष वेधले. याच रुग्णांचे हे काही प्रातिनिधिक अनुभव..

कीटकनाशकाने मरणारे शेतकरीही बेदखल

यवतमाळ जिल्ह्यत कीटकनाशकांचे बळी ठरलेले शेतकरी दीपक मडावी, सुशील चव्हाण, सिडाम, मधुकर बावणे, प्रकाश माणगावकर, पारकेवार या शेतकऱ्यांच्या विधवा पत्नीनींही यावेळी आपल्या व्यथा मांडल्या. लता बावणे म्हणाल्या, सरकारने अद्याप यापैकी एकाही शेतकऱ्यांच्या मृत्यूवरून कीटकनाशक कंपन्यांना जबाबदार धरत नुकसान भरपाई दिली नाही. यातील प्रत्येक जण ग्रामीण रुग्णालयात उपचार सुविधा, औषधे न मिळाल्याने दगावला आहे. तरीही सरकार जबाबदारी स्वीकारायला तयार नाही. पुढचे मृत्यू टाळण्यासाठी या रुग्णालयांची स्थिती सुधारणे गरजेचे आहे.

पैशांसाठी रुग्णालयात डांबले

बारामतीजवळ अपघातात जखमी झाल्याने खासगी रुग्णालयात गेलो. साडेसहा लाखांचे देयक भरल्यावरही ५० हजार रुपयांसाठी रुग्णालयाने डांबून ठेवले. यादरम्यान उपचारही बंद केला. अखेर शेत विकून पैसे दिले. त्यानंतरही रुग्णालयाने पैशाची मागणी केल्यावर काही सामाजिक संस्थेच्या मदतीने मुख्यमंत्री सहायता निधीतून एक लाख रुपये रुग्णालयाला दिले, परंतु तरीही डॉक्टरांनी थकबाकी काढली. अखेर दागिने विकून पैसे द्यावे लागले.

 -भाऊराव सूर्यवंशी परभणी</strong>

नसलेल्या कर्करोगावर २० लाखांचा खर्च

२०१२ मध्ये पोटदुखीच्या त्रासावरील उपचारासाठी मुंबईच्या मुलुंड येथील एका खासगी रुग्णालयात दाखल झालो. डॉक्टरांनी हर्नियाचे निदान केले. त्यानंतर कर्करोग झाल्याचे सांगत आतडय़ाची शस्त्रक्रिया केली. त्यात गुंतागुंत झाल्याने कोमात गेलो. नातेवाईकांनी इतर रुग्णालयात हलवले. कोमातून बाहेर आल्यावर मला कर्करोग नसल्याचे कळले, परंतु आजपर्यंत २० लाख रुपये खर्च झाले. आता मला पोटाला पिशवी लावून फिरावे लागते. न्याय मागण्यासाठी गेली सहा वर्षे महाराष्ट्र वैद्यक परिषदेपासून विविध कार्यालयांत चकरा मारल्यावरही न्याय मिळत नाही.

 – चंद्रशेखर कुळकर्णी, मुंबई</strong>