महिलेचा मृत्यू झाल्याने नातेवाईक संतप्त

यवतमाळ : येथील एका खासगी कोविड रुग्णालयात करोनाबाधित महिला रुग्ण दगावल्यानंतर तिचा मृत्यू रुग्णालय व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणामुळे  झाल्याचा आरोप करीत नातेवाईकांनी तोडफोड केली. मंगळवारी रात्री उशिरा घडलेल्या या घटनेने शहरात खळबळ उडाली.

येथील शहा हॉस्पिटलमध्ये मंगळवारी रात्री घाटंजी तालुक्यातील शिवणी येथील कविता धनराज चव्हाण (४८) या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयातील डॉक्टरांनी चुकीच्या पद्धतीने उपचार केल्याने कविताचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत दवाखान्यात प्रचंड गोंधळ घालत तोडफोड केली. कविता चव्हाण ही करोनाबाधित महिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत होती. प्रकृती चिंताजनक असल्याने मंगळवारी दुपारीच तिला येथील डॉ. महेश शहा यांच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले. येथे तिला प्राणवायू लावण्यात आलेला होता. मात्र त्याची पातळी कमी होत असल्याने कृत्रिम जीवनरक्षक प्रणालीवर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. ही प्रक्रिया सुरू असतानाच कविताचा मृत्यू झाला. त्यामुळे संतप्त नातेवाईकांनी डॉक्टरांना जाब विचारत उपचारादरम्यान रुग्णालयातील परिचारिकेने ऑक्सिजन मास्क काढल्यानेच तिचा मृत्यू झाला, असा आरोप करत रुग्णालयात तोडफोड केली.

कविताची प्राणवायूची पातळी कमी झाल्याने तिला कृत्रिम जीवरक्षक प्रणालीवर ठेवताना तिचा मृत्यू झाला, असे स्पष्टीकरण रुग्णालयाच्या वतीने देण्यात आले. मात्र संतप्त नातेवाईकांचे त्यामुळे समाधान झाले नाही. त्यांनी रुग्णालयात गोंधळ घालून टीव्ही, संगणक, काचेचे दरवाजे फोडून अन्य साहित्याचेही नुकसान केले. यावेळी रुग्णांना लावण्यासाठी आणलेल्या प्राणवायूच्या टाक्यांचीही फेकाफेक करण्यात आली. यामुळे रुग्णालयात दहशतीचे वातावरण निर्माण झाले. अवधूतवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनेनंतर मात्र याप्रकरणी दोन्ही पक्षांच्या वतीने आपसी तडजोड झाल्याने कोणाचीही तक्रार नसल्याने गुन्हा दाखल करण्यात आला नाही, अशी माहिती अवधूतवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक मनोज केदारे यांनी दिली.