News Flash

दुष्काळामुळे पत्रावळींची रोजची लाखोंची उलाढाल

पाणी बचतीला आधार; नाश्ता-जेवणासाठी वापर वाढला!

पाणी बचतीला आधार; नाश्ता-जेवणासाठी वापर वाढला!
गेल्या काही वर्षांंपासून अडगळीत पडलेल्या ‘वापरानंतर टाकावू’ पत्रावळींचा दुष्काळ आता मात्र सरला आहे! दुष्काळामुळेच पत्रावळींना चांगला भाव आला असून, पत्रावळी तसेच तत्सम वस्तूंच्या विक्रीत दुपटीने वाढ झाली आहे. अनेकांनी रोजच्या जेवणासाठी ताटाऐवजी पत्रावळीचा पर्याय स्वीकारल्याने या व्यवहारातून एकटय़ा नांदेड जिल्ह्णाात दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत आहे.
सार्वजनिक कार्यक्रम असो की घरगुती, पत्रावळी किंवा केळी पानांना मोठे महत्त्व होते व आहे. मात्र, अलीकडच्या काळात शहरी भागात झपाटय़ाने वाढलेली मंगल कार्यालये, बुफे डिनर संस्कृती, केटरींग यामुळे पत्रावळी जवळपास हद्दपार झाली होती. पळसाच्या पानांपासून तयार होणाऱ्या पत्रावळींचे महत्त्व शहराप्रमाणेच ग्रामीण भागातून हळूहळू कमी झाले. सार्वजनिक कार्यक्रमात भोजनासाठी फायबर किंवा स्टिलच्या प्लेटचा उपयोग मोठय़ा प्रमाणात सुरू झाला. लग्न, मुंज, वास्तुशांती यांसारख्या कार्यक्रमात पंगतीऐवजी बुफे संस्कृती बळावल्याने पत्रावळीचे अस्तित्व संपुष्टात आले होते.
गेल्या १० वर्षांत पत्रावळींचा वापर लक्षणीय कमी झाला आहे. त्या जागी कागदी पेपर, प्लेट, सिल्वर प्लेट, नाश्ता प्लेट, पिण्याचे पाणी, चहा या साठी प्लास्टिक ग्लासचा वापर मोठय़ा प्रमाणात वाढला. काही प्रमाणात चहासाठी थर्माकोलच्या ग्लासचाही वापर होत आहे. या साठी नांदेड जिल्हा तसेच लगतच्या तेलंगणा राज्यात मोठय़ा प्रमाणावर छोटे-मोठे लघुउद्योग उभारले गेले.
यंदा दुष्काळाची दाहकता मोठय़ा प्रमाणावर आहे. गेल्या ४-५ वर्षांपासून पावसाच्या लहरीपणामुळे जिल्हा कोरडाठाक पडला आहे. या पाश्र्वभूमीवर पत्रावळींना मोठी मागणी आहे. पूर्वी पळसाच्या पानापासून तयार होणाऱ्या पत्रावळींनी आता प्लास्टिक, तसेच कागदी पत्रावळींनी जागा घेतली आहे. तेलंगणा राज्यात विशेषत: हैदराबाद परिसरात कागदी पेपर प्लेट, प्लास्टिक ग्लास व नाश्ता प्लेट तयार करण्याचे मोठे उद्योग उभारले गेले आहेत. नांदेड जिल्ह्णाात तेलंगणामधूनच दररोज या वस्तूंचा पुरवठा होतो. पूर्वी केवळ सार्वजनिक कार्यक्रमातच वापरल्या जाणाऱ्या पत्रावळी आता अनेकांनी रोजच्या भोजनासाठी वापरण्यास प्रारंभ केला आहे.
भोजनाचे ताट धुण्यासाठी लागणारे पाणी वाचावे म्हणून अनेक मोठय़ा कुटुंबांनीही आता दररोजच्या भोजनासाठी कागदी पेपर प्लेटचा सर्रास उपयोग सुरू केला आहे. ग्रामीण भागात सुरुवातीच्या काळात केळीच्या पानाचा वापर केला गेला खरा, पण केळीचे उत्पादन घसरल्याने आता कागदी पेपरप्लेटचा वापर केला जात आहे. विशेष म्हणजे या वापरानंतर टाकाऊ वस्तूंच्या किमती अस्थिर आहेत. कागदी पेपरप्लेट, सिल्व्हर पेपर प्लेट, प्लास्टीक ग्लास या पॅकिंगवर कोणतेही दर नाहीत किंवा त्या कुठे उत्पादित केल्या जातात याचा उल्लेख नाही. ग्राहकांची वाढती मागणी लक्षात घेऊन शहरात काही व्यापाऱ्यांनी याचे दर वाढवले आहेत.

दुपटीने वाढ
पत्रावळीचे कागदी प्लेटचे पान पूर्वी ३० ते ३२ पशाला पडत होते. आता त्यासाठी ५० पसे मोजावे लागत आहेत. प्रत्येक वस्तूच्या मागे २० ते २५ टक्के वाढ झाली आहे. वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी प्रसिद्ध असलेले व्यापारी गणेश िशपाळे यांनी सांगितले की, सार्वजनिक कार्यक्रमात आता याच वस्तूंचा वापर वाढला आहे. एवढेच नाही, तर दुष्काळाच्या दाहकतेमुळे अनेक छोटय़ा-मोठय़ा एकत्रित कुटुंबांत ताटांऐवजी कागदी पेपरप्लेटचाही वापर केला जात आहे. त्यामुळे एकतर पाण्याची बचत होते, मेहनतही कमी लागते. अशा वस्तूंच्या विक्रीमध्ये दुपटीने वाढ झाली आहे. आगामी काळात ही विक्री आणखी वाढेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 10, 2016 2:05 am

Web Title: patravali use increased in drought area
Next Stories
1 मांडवा बंदरातील तरंगत्या जेटीचे काम रखडले
2 अवकाळी पावसाचा दणका; आंब्याची चव यंदाही महाग
3 ‘घरातील महिलांच्या कर्तृत्वाला संधी द्या’
Just Now!
X