दिगंबर शिंदे

महापालिकेचे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल उभे राहण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. त्यामुळे आवश्यक आणि जनहिताच्या कामांत हात धुऊन घेण्याचे प्रयत्न फसले आहेत. महापालिकेचे एकही ‘मल्टिस्पेशालिटी हास्पिटल’ नसताना निधी असूनही गेली चार वर्षे केवळ जागा कोणती, या मुद्दय़ावर हा प्रश्न रेंगाळत ठेवण्यात आला होता. आता रुग्णालय उभारण्यासाठी जबर इच्छाशक्तीची गरज आहे.

करोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी जागा उपलब्ध होत नव्हती. त्यामुळे जीव कंठाशी येण्याचा अनुभव सांगलीकरांनी घेतला. संसर्ग वाढत असताना रुग्णसंख्याही ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये वाढली. बाधित रुग्णांना उपचारासाठी पैसे देऊनही जागा नसल्याच्या कारणावरून उपचार मिळणे दुरापास्त झाले आहे. शरीरातील प्राणवायूचे प्रमाण कमी झालेल्या रुग्णांना वेळेत सुविधा न मिळाल्याने काही रुग्णांना जीव गमवावा लागला. एके काळी शहराचा कारभार हाती असलेल्या एका लोकप्रतिनिधीला वेळेत उपचार न मिळाल्याने जीव गमवावा लागला.

महापालिकेचे स्वतंत्र बहुविध आजारासाठी उपचार केंद्र असावे यासाठी २००७ पासून प्रयत्न होते. या प्रयत्नाला शासनाने २०१३ मध्ये सकारात्मक प्रतिसाद देत मान्यताही दिली. शहराच्या विविध भागांत १० प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि एक ‘मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल’ उभारणीचा प्रस्ताव तयार करण्यात आला. सांगली व मिरज येथे रुग्णालये आहेत, मग नवे रुग्णालय कुपवाडलगत असावे, अशी भूमिका माजी मंत्री मदन पाटील यांनी मांडली. त्यासाठी काँग्रेसच्या सत्ताकाळात वारणाली परिसरात, मात्र कुपवाडच्या हद्दीमध्ये ४० हजार चौरस फु टांची जागाही महापालिकेने खरेदी करून केवळ रुग्णालयासाठी आरक्षित ठेवली.

याच जागेवर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलसह १० ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र उभारणीचा प्रस्ताव शासनाकडून २०१६ मध्ये मंजूर झाला. मल्टिस्पेशालिटी रुग्णालयासाठी ५ कोटींचा निधीही उपलब्ध करण्यात आला. मात्र याबरोबर मंजूर झालेल्या १० पैकी ८ प्राथमिक आरोग्य केंद्रांचे कामकाज सुरू झाले. आजच्या साथीच्या काळात ही प्राथमिक आरोग्य केंद्र चांगले काम करीत असून याचा रुग्णांना प्रत्यक्ष लाभही होत आहे.

महापालिकेत सत्ताबदल झाला आणि रुग्णालय वारणालीच्या नियोजित जागेत उभारणीस विरोध होऊ लागला. यासाठी कुपवाडकरांना अपुरी माहिती देऊन जनमत तयार करण्याचा प्रयत्नही झाला. समर्थन आणि विरोध यातून रुग्णालय उभारणी लांबणीवर पडली. मात्र कारभाऱ्यांना रुग्णालय उभारणी होऊन नागरिकांची सोय होण्यापेक्षा खासगी जागा खरेदीत जास्त स्वारस्य असल्याचे गेल्या दोन वर्षांत दिसून आले.

सत्ताधारी भाजपने संख्याबळ वाढविण्यासाठी जागा खरेदीच्या व्यवहाराला मूक संमती दिली. यातून रुग्णालय कुपवाड येथेच व्हावे, असा ठरावही महासभेत संमत करण्यात आला. यामुळे पुन्हा एकदा हा प्रश्न रेंगाळला. तत्कालीन आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी याप्रश्नी जनमत घेऊन हा प्रश्न निकाली काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांची बदली होताच खासगी जागेवर रुग्णालय उभे करण्याचे प्रयत्न सुरू होते.

महासभेने जागाबदलाचा केलेला ठराव रद्द करून शासनाने मूळ जागी म्हणजे वारणाली परिसरातच रुग्णालय उभे करण्याचे निर्देश दिले आहेत. आता नव्याने यासाठी महासभेचा ठराव करावा लागणार आहे. यासाठी शासनाने एक महिन्याची मुदत दिली असून आता हा जागेचा प्रश्न निकाली निघण्याची चिन्हे आहेत. वाढीव दरानुसार ५ कोटींचा मूळ आराखडा आता सात कोटी ४८ लाखांवर जाणार असून त्या दृष्टीने प्रशासकीय पातळीवरून हालचाली सुरू झाल्या असून महासभेनंतर निविदा प्रक्रिया सुरू होण्यात काहीच अडचण येणार नाही असे सध्या तरी वाटते. शासनाकडून प्राप्त झालेली ५ कोटींची ठेव आता व्याजासह साडेसहा कोटींवर पोहोचली असून अतिरिक्त लागणारा निधी उभा करण्यास महापालिकेस काही अडचण येणार नाही.

शहरातील लोकांना चांगल्या आरोग्य सुविधा पुरविण्याची महापालिकेची जबाबदारी आहे. मात्र महापालिका स्थापन होऊन वीस वर्षांचा कालावधी झाला तरी एखादे स्वत:चे इस्पितळ उभे करता आलेले नाही. ही उणीव यानिमित्ताने दूर होणार असल्याने जागानिश्चितीसाठी अडून न राहता विकासकामासाठी कारभाऱ्यांनी पुढाकार घ्यायला हवा. करोना संकटाच्या काळात लोकांचे उपचारासाठी प्रचंड हाल होत आहेत.

‘मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल’चे स्थलांतर करण्याचा महासभेचा ठराव निलंबित करण्यात आला. निर्णय घेण्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत जर मूळ आराखडय़ानुसार रुग्णालय उभारणीचा ठराव झाला तर ठराव व्यपगत होईल. अन्यथा, आयुक्त स्वअधिकारात हा ठराव रद्द करण्याची शिफारस नगरविकास विभागाला करू शकतील. दुसऱ्या बाजूला भाजप पक्ष म्हणून काय भूमिका घेतो, यावर बरेच काही अवलंबून असेल. प्रसंगी स्थलांतरासाठी न्यायालयात जाण्याच्या हालचालीही सुरू आहेत.

शहरात अद्ययावत सुसज्ज मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल झालेच पाहिजे यात शंका नाही, ही काळाची गरज आहे. निधीची उपलब्धता असताना विकासकाम रेंगाळणे आणि परिणामी अधिक खर्चीक होणे परवडणारे नाही. याबाबत पक्षाचे नेते काय भूमिका घेतील त्यासोबत असेन, मात्र आराखडय़ानुसार आणि लवकरात लवकर हॉस्पिटल उभे राहावे, अशी आमची भूमिका आहे.

– आनंदा देवमाने, उपमहापौर

महापालिकेची रुग्णालयासाठी असलेली आरक्षित जागाच वापरली जाणार असल्याने खर्च कमी होणार असून ५० खाटांचे हे रुग्णालय सामान्य सांगलीकरांसाठी वरदान ठरणार आहे. हे लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी पालकमंत्री जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपण पूर्ण ताकदीने प्रयत्नशील राहू.

– विष्णू माने, नगरसेवक