24 November 2017

News Flash

खंडणीच्या गुन्ह्यात पवन पवारला पोलीस कोठडी

दरमहा एक लाख रुपयांच्या खंडणीसाठी वाहतूकदाराला धमकी दिल्याप्रकरणी नाशिक रोड प्रभाग समितीचा सभापती पवन

प्रतिनिधी, नाशिक | Updated: February 27, 2013 4:36 AM

दरमहा एक लाख रुपयांच्या खंडणीसाठी वाहतूकदाराला धमकी दिल्याप्रकरणी नाशिक रोड प्रभाग समितीचा सभापती पवन पवार याची मंगळवारी न्यायालयाने २८ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली. खंडणीच्या गुन्ह्य़ाबरोबर पवारवर लष्करी जवानास रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून धमकाविल्याचाही गुन्हा उपनगर पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. खंडणीच्या गुन्ह्यातील पोलीस कोठडीची मुदत व तपास पूर्ण झाल्यानंतर उपनगर पोलीस त्याला ताब्यात घेतील, असे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.
साधारणत: दोन वर्षांपूर्वी एका पोलीस कर्मचाऱ्याच्या हत्या प्रकरणातही प्रमुख संशयित म्हणून पवन पवारवर गुन्हा दाखल आहे. त्या प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर पवार हा उजळ माथ्याने चतुराईने सामाजिक क्षेत्रात कार्यरत झाला. महापालिका निवडणुकीत अपक्ष म्हणून मैदानात उतरून त्याने ही निवडणूक लीलया जिंकली. एवढेच नाही तर, गुरमित बग्गा यांच्या नेतृत्वाखाली अपक्ष नगरसेवकांच्या गटात पवार सहभागी झाला आणि नाशिक रोड प्रभाग समितीचे सभापतीपद पटकावले. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादीचाही त्याला अप्रत्यक्षपणे पाठिंबा मिळाल्याने तो या पदावर विराजमान झाला. सभापतीपदाचा लाभ उठवत महापालिकेतर्फे आयोजित विविध कार्यक्रमांमध्ये त्याने मिरवून घेतले. पवारविरुद्ध एकाच दिवशी नाशिक रोड व उपनगर पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल झाले. मालवाहतूकदार दीपक भाटिया यांनी, पवारने दरमहा एक लाख रुपयांची खंडणी मागितल्याची तक्रार दिली. नाशिक रोड प्रभाग समितीच्या कार्यालयात बोलावून व्यवसाय बंद करण्यासाठी दमबाजी केली.
 तेव्हापासून दरमहा एक लाख रुपयांच्या खंडणीसाठी पवन पवार, त्याचा भाऊ विशाल पवार व इतर तीन साथीदार दमदाटी करत होते. त्यानंतर पुन्हा संबंधितांनी धमकावून दरमहा एक लाख रुपयांची मागणी करत अन्यथा जिवे मारण्याचीही धमकी दिली. या घटनाक्रमानंतर भयभीत झालेल्या भाटिया यांनी पोलीस ठाणे गाठले. या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात मंगळवारी पवारला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, पवार याच्याविरोधात दुसरा गुन्हा उपनगर पोलीस ठाण्यात दाखल झाला. हवाई दलातील कर्मचारी विलास हांडोरे यांना पिस्तुलाचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी त्यांनी तक्रार दिल्यानंतर पवारसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

First Published on February 27, 2013 4:36 am

Web Title: pawan pawar get police custody in extortion case