केंद्र सरकारवर पवार यांची अप्रत्यक्ष टीका

निर्णय घेणे सोपे असते. मात्र, त्याची अंमलबजावणी करणे अवघड काम आहे, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अप्रत्यक्षपणे केंद्र सरकारवर टीका केली. केंद्र सरकारने मध्यंतरी प्रत्येक जिल्ह्यत शासकीय वैद्यकीय रुग्णालय आणि अभिमत विद्यापीठ काढू, असा निर्णय घेतला. मात्र, त्याचे मूर्तरूप अद्याप समोर आले नाही. याकडेच रोख ठेवून शरद पवार यांनी वरील विधान केले.

येथील महात्मा गांधी मिशन अभिमत विद्यापीठाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते शुक्रवारी बोलत होते. मंचावर ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर, एमजीएमचे अध्यक्ष कमलकिशोर कदम, सचिव अंकुशराव कदम, कुलगुरू डॉ. सुधीर गव्हाणे, आमदार दिलीप वळसे पाटील, राजेश टोपे, सतीश चव्हाण, फौजिया खान आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले, केंद्र सरकारने मध्यंतरी अभिमत विद्यापीठांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्याची अद्याप अंमलबजावणी झालेली दिसत नाही. कोणताही निर्णय घेणे सोपे असते. मात्र, त्याची अंमलबजावणी करणे अवघड आहे. एक डॉक्टर व एक अभियंता तयार करण्यासाठी शासनाला मोठी गुंतवणूक करावी लागते. मात्र, एमजीएमने शासकीय मदतीशिवाय गुणवत्ताधारक विद्यार्थी उभे करण्याचे आव्हान पेलले. औरंगाबादची ओळख आता शैक्षणिक हब म्हणून होत आहे. कोणत्याही समस्येला तोंड देणारी गौरवशाली पिढी निर्माण व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. विज्ञान व संशोधनाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असेही ते म्हणाले.

प्रास्ताविक कमलकिशोर कदम यांनी केले. त्यात त्यांनी एमजीएमच्या माध्यमातून आजपर्यंत ५० हजार अभियंते आणि दहा हजार डॉक्टर्स तयार झाल्याचे सांगितले. गांधीजीच भारतीयांची ओळख साधेपणा, सुसंस्कृतपणा आणि समता-समानता, हा जीवनमूल्ये शिकवणारा विचार महात्मा गांधीजींनी आम्हाला दिला. आजही जगात भारतीयांना जी ओळख मिळते ती गांधींच्या देशातील नागरिक म्हणूनच आहे, असेही पवार म्हणाले.