‘छ. शिवाजी महाराज हे मूळ क्षत्रिय कुळाचे नाहीत, तर त्यांचा जन्म शूद्र जातीत झाला होता’, असं वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या अभिनेत्री पायल रहतोगीने सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीरपणे माफी मागितली आहे. एक व्हिडिओ शेअर करुन तिने ही माफी मागितली आहे. पायलने रविवारी छ. शिवाजी महाराजांविषयी एक वादग्रस्त ट्विट केलं होतं. त्यानंतर तिला सोशल मीडियावर चांगलचं ट्रोल करण्यात आलं होतं.

छ. शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे “मी मराठी बांधवांची माफी मागते. ज्यांना असं वाटतंय की, मी त्यांच्या महाराजांचा अनादर केला त्या साऱ्यांची मनापासून माफी मागते.भारत देशामध्ये एखादी गोष्ट जाणून घेण्याचादेखील मला अधिकार नाही”, असं म्हणत पायलने सोयिस्करपणे माफी मागितली आहे.

पुढे ती म्हणते, “मी विचारलेल्या एका साध्या सरळ प्रश्नाचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. छ. शिवाजी महाराज हे महान राजा आहेत आणि मी देखील त्यांचा आदर करते. त्यांचा अनादर करावा असा माझा हेतू नव्हता. परंतु जे वक्तव्य मी केलं होते, त्यासंदर्भात काही गोष्टी वाचल्या होत्या. त्यानंतरच मी हे विधान केलं होतं. मात्र सोशल मीडियावर मला ट्रोल करण्यात आलं”.

वाचा : ‘शिवाजी महाराजांचा जन्म शूद्र जातीत’; बॉलिवूड अभिनेत्रीचं वादग्रस्त ट्विट

दरम्यान, पायलने रविवारी ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर एक पोस्ट करुन छ. शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. “शिवाजी महाराज हे मूळ क्षत्रिय कुळाचे नाहीत, तर त्यांचा जन्म शूद्र जातीत झाला होता”, असं तिने या पोस्टमध्ये म्हटलं होतं.