सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे रेशन दुकानदार आणि किरकोळ केरोसिन विक्रेते प्रचंड अडचणीत सापडले असून त्यांच्या समस्या तात्काळ सोडवल्या गेल्या नाहीत तर शेतकऱ्यांप्रमाणेच त्यांच्यावरही आत्महत्या करण्याची वेळ येईल आणि त्यासाठी सरकार जबाबदार राहील, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंधू आणि अखिल भारतीय रेशन दुकानदार संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रल्हाद मोदी यांनी रविवारी येथे बोलताना केली.

येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात आयोजित रेशन दुकानदारांच्या विभागीय मेळाव्यात ते बोलत होते. रेशन दुकानदारांना मिळणाऱ्या कमिशनवर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होऊ शकत नाही. त्यामुळे त्यांचे कमिशन ७० रुपयांवरून दीडशे रुपये करावे, अशी आमची प्रमुख मागणी आहे. एलपीजी वितरण व्यवस्था द्विस्तरीय केली पाहिजे. त्यात डिलरशिप आणि रिटेलर्स, असे भाग करून रिटेलर्स शॉप हे रेशन दुकानदारांकडे दिले पाहिजेत. त्याचा लाभ रेशन दुकानदारांना मिळेल आणि सरकारचे अनुदानही वाचेल, असे प्रल्हाद मोदी यांनी सांगितले.

रेशन दुकानदारांनी संघटनशक्ती मजबूत केली पाहिजे. त्या माध्यमातूनच सरकारवर दबाव आणता येऊ शकेल. सरकार कोणतेही असो, ते गेंडय़ाच्या कातडीचे असते. त्यामुळे आमच्या हक्कांसाठी आम्हाला कुठल्याही सरकारशी संघर्ष करावा लागला तरी आम्ही मागेपुढे पाहणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना आपणच त्यांच्या सरकारविरोधात आंदोलन केले होते, असे प्रल्हाद मोदी म्हणाले.

एपीएल आणि बीपीएलच्या घोळात महाराष्ट्रात रेशनचे वितरण कमी झाल्याने कमिशनपोटी रेशन दुकानदारांना मिळणाऱ्या उत्पन्नातही घट झाली आहे. त्या तुलनेत गुजरातमधील स्थिती चांगली आहे. तेथील प्रक्रिया संपूर्णपणे ऑनलाईन असल्याने घोटाळे होण्याची शक्यता कमी आहे, असेही ते म्हणाले. यावेळी व्यासपीठावर रास्त भाव दुकानदार संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष डी.एन. पाटील, संघटनेचे प्रदेश पदाधिकारी राजेश अंबूसकर, चंद्रकांत यादव, कमलेश तायडे, सुरेश उल्हे आदी उपस्थित होते.

आंदोलनापासून दूर राहण्याचा संदेश

रेशन दुकानदारांच्या प्रश्नांसंदर्भात आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्याचा प्रयत्न केला, पण अजून त्यांची भेट होऊ शकलेली नाही. त्यात काय अडचणी आहेत, हे आपल्याला ठावूक नाही. पेट्रोलियम मंत्र्यांना भेटीची वेळ मागितली, परंतु त्यांनी अद्याप वेळ दिलेली नाही. यात पेट्रोलियम मंत्रालयाच्या टक्केवारीचा विषयही असू शकतो, असा आरोप प्रल्हाद मोदी यांनी केला. आपल्याला आंदोलनापासून दूर राहण्याचा संदेश पाठवला जातो, असाही गौप्यस्फोट त्यांनी केला. सुरुवातीला केंद्र सरकार आमच्या मागण्यांकडे लक्षच देत नव्हते, पण दिल्लीत काढलेल्या ४ लाख दुकानदारांच्या मोर्चानंतर थोडीफार हालचाल झाली आहे, असे प्रल्हाद मोदी यांनी सांगितले.