News Flash

सिंधुदुर्गात २० वर्षांत प्रथमच शांततेत मतदान

गेल्या २० वर्षांत प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात शांततेत मतदान झाले. जिल्ह्य़ात सर्वच पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढविल्याने मतदानात वाढ होण्याची शक्यता होती

| October 16, 2014 04:24 am

गेल्या २० वर्षांत प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात शांततेत मतदान झाले. जिल्ह्य़ात सर्वच पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढविल्याने मतदानात वाढ होण्याची शक्यता होती, पण संध्याकाळी ५ वाजेपर्यंत जिल्ह्य़ात ५६ टक्के मतदान झाले. त्यामुळे संध्याकाळी ६ वाजेपर्यंत सरासरी ६० टक्के मतदान अपेक्षित आहे.
जिल्ह्य़ात प्रथमच शांततेत मतदान झाले. काही किरकोळ अफवा आणि तक्रारी सोडता राडा संस्कृतीचे या वेळी दर्शन घडले नाही.
नारायण राणे, नितेश राणे या उमेदवारांनी कणकवली वरवडे तर प्रमोद जठार यांनी कणकवली-कासार्डे तर वैभव नाईक यांनी कणकवली येथे मतदान केले. दीपक केसरकर यांनी सावंतवाडी शहरात, सुरेश दळवी यांनी कोनाळ येथे मतदान केले. या विधानसभा निवडणुकीत मतदारयाद्यांत थोडा गोंधळ उडाला. उमेदवारांना देण्यात आलेल्या मतदारयादीत नावे होती, पण मतदान केंद्रातील यादीतून नावे गायब दिसली तसेच काही ठिकाणी नावे गायब असल्याचे स्पष्ट झाले.
या निवडणुकीत तरुणांनी मतदान उत्स्फूर्तपणे केले. सकाळपासून मतदानाचा ओघ नव्हता. मतदानाची टक्केवारी दर दोन तासांनी फक्त १० ते १२ टक्क्यांनी वाढली.
गेले काही दिवस दुपारच्या वेळी पाऊस कोसळत होता, पण आज पाऊस कोसळला नाही. तसेच भातकापणीचा हंगाम असल्याने मतदान कमी झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
या निवडणुकीत जिल्ह्य़ात ३ जागांसाठी २४ उमेदवार िरगणात असून नारायण राणे, नितेश राणे, प्रमोद जठार, दीपक केसरकर, राजन तेली, परशुराम उपरकर अशा लढतीकडे सर्वाचे लक्ष वेधले आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 16, 2014 4:24 am

Web Title: peaceful voting after 20 years in sindhudurg
टॅग : Sindhudurg,Voting
Next Stories
1 निवडणूक कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
2 सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात ६५ टक्के मतदान
3 कोल्हापूर जिल्ह्यातील ८० टक्के मतदान
Just Now!
X