धवल कुलकर्णी

करोना व्हायरस या संकटामुळे लावण्यात आलेल्या टाळेबंदी चा फायदा बेकायदेशीरपणे जंगलांमध्ये जाऊन शिकार करणारे समाजकंटक घेत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोन शेकरूच्या झालेल्या शिकारी नंतर सातारा जिल्ह्यामध्ये मोराची शिकार झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी साताऱ्यातल्या पाटणमधून दोघांना अटक करण्यात आली आहे.

वी क्लेमेंट बेन, मुख्य वन्यजीव संरक्षक कोल्हापूर प्रादेशिक वनवृत्त यांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास वनखात्याला गुप्त माहिती मिळाली की सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यामध्ये गुरवली नावाच्या मालकी क्षेत्रात एका लांडोरीची शिकार झाली आहे.यानंतर वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन शोध घेतला असता शिकार करणाऱ्याचे नाव विनायक बाळासाहेब निकम (वय ४२) असल्याचे समजले आहे. तसेच त्याची मालकी असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये मृत मोर लांडोर आणि डबल बार बंदुक हे साहित्य मिळाले आहे.

वनखात्याच्या कर्मचाऱ्यांनी विनायक बाळासाहेब निकम आणि राहुल बाळासाहेब निकम (वय ४१) यांना अटक करून त्यांच्या विरोधामध्ये भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ च्या संबंधित कलमान्वये गुन्हा नोंद केला. वनक्षेत्रपाल विलास काळे यांनी सांगितले या दोघा आरोपींना अटक करण्यात आली आहे. आत्ता पर्यंत या दोघांचा यापूर्वी अशा गुन्ह्यांमध्ये समावेश असल्याचा रेकॉर्ड मिळालेला नाही.

महत्त्वाची गोष्ट अशी मोर हा राष्ट्रीय पक्षी आहे तर शेकरु म्हणजेच उडणारी खार हिला राज्य प्राण्याचा दर्जा आहे. वनखात्याचे अधिकारी मान्य करतात की सध्या टाळेबंदी मुळे यंत्रणेचे लक्ष हे वेगळ्या कामांमध्ये लागल्यामुळे या परिस्थितीचा फायदा बेकायदेशीरपणे शिकार करणारी मंडळी घेऊ पाहत आहेत. त्यामुळे वन खात्याला अधिकच जागरूक रहावे लागत आहे.