15 July 2020

News Flash

पश्चिम वऱ्हाडात पीककर्ज वाटप मंद गतीने

पीक कर्ज वाटपाची गती वाढत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे

संग्रहित छायाचित्र

ऐन हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांचे हेलपाटे ; प्रशासनाने निर्देश देऊनही परिणाम नाही

प्रबोध देशपांडे

करोनाचा सर्वच क्षेत्रावर विपरीत परिणाम होत असताना पीक कर्ज वाटप प्रक्रियेलाही याचा जबर फटका बसला आहे. पश्चिम वऱ्हाडात पीक कर्ज वाटप संथगतीने सुरू असल्याने ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना बँकांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. सत्ताधारी व प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वारंवार सूचना देऊनही पीक कर्ज वाटपाची गती वाढत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

राज्यात दरवर्षी जिल्हानिहाय पीक कर्ज वाटपाचे नियोजन करण्यात येते. मात्र, प्रत्येक जिल्हय़ात उद्दिष्टाच्या ३०-३५ टक्क्यांच्या आतच कर्ज वाटप केले जाते. विविध कारण पुढे करून शेतकऱ्यांना कर्जासाठी अपात्र ठरवण्याचे प्रमाण मोठे आहे. त्यातच यावर्षी करोनाचे विश्वव्यापी संकट कोसळले.

पश्चिम वऱ्हाडातील शेतकऱ्यांनी तूर, कापूस, सोयाबीन, हरभरा, गहू, कांदा आदी पिकांचे मोठय़ा प्रमाणावर उत्पादन घेतले. खरीप हंगाम काही दिवसांवर असताना अद्यापही शेतमाल शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे. कांद्याला भाव मिळाला नाही. व्यापाऱ्यांकडून मातिमोल भावात खरेदी करण्यात येत असल्याने उत्पादन खर्चही निघाला नाही.

कापूस खरेदीची शासनाची वेळकाढू व क्लिष्ट प्रक्रिया असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. कापूस घरातच पडून असल्याने पैसा हातात आलेला नाही. अशा वेळी तोंडावर आलेल्या शेती हंगामाचे नियोजन करावे कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला. खरीप हंगामाच्या नियोजनासह पेरणीसाठी पीक कर्जाचा आधार मिळण्याच्या आशेवर शेतकरी वर्ग बँकांमध्ये गर्दी करीत आहेत. मात्र, बँकांकडून कागदपत्रांसह विविध कारणांवरून शेतकऱ्यांची सातत्याने अडवणूक होतच आहे. कृषिमंत्री व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली जात आहे.

२५ मार्चपासून राज्यात संचारबंदी लागू करण्यात आल्याने दरवर्षी १ एप्रिलपासून सुरू होणारे पीक कर्जाचे वाटप यावर्षी २६ एप्रिलपासून सुरू करण्यात आले.

बुलढाणा जिल्हय़ात तीन लाख ६२ हजार ८२८ शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्यासाठी २४६० कोटींचे उद्दिष्ट ठरविण्यात आले. त्यापैकी आतापर्यंत २५ हजार ७२१ शेतकऱ्यांना १९० कोटींचे कर्ज देण्यात आले. वाटपासाठी ठरवल्यापैकी ७ टक्के शेतकऱ्यांना उद्दिष्ट रकमेच्या केवळ ७.७२ टक्के कर्जवाटप झाले आहे. बुलढाणा जिल्हय़ात पीक कर्ज वाटपासाठी तीन लाख ६२ हजार ८२८ शेतकरी संख्या निश्चित करण्यात आली, तरी प्रत्यक्षात एक लाख ३० हजार ३०० शेतकरी कर्जासाठी पात्र ठरत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. केवळ पात्र शेतकऱ्यांचा आकडा विचारात घेतल्यास १९.७३ टक्के कर्ज वाटप झाले. वाशीम जिल्हय़ात पीक कर्ज वाटपाचे १६०० कोटींचे उद्दिष्ट ठरवण्यात आले. त्यापैकी आतापर्यंत २०९ कोटी रुपयांचे कर्ज २३ हजार ३०० शेतकऱ्यांना देण्यात आले. वाशीम जिल्हय़ात १३ टक्के पीक कर्जाचे वाटप झाले आहे. खरीप हंगामातील शेतकऱ्यांची गरज लक्षात घेता पीक कर्ज वाटपाला गती देण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे. सद्य:स्थितीत बदल न झाल्यास शेतकरी पुन्हा एकदा सावकारी कर्जाच्या गर्तेत अडकण्याची चिन्हे आहेत.

‘कर्जमुक्ती’त पात्र असूनही नकार

महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देत त्यांची कर्ज खाती निरंक करून त्यांना पीक कर्ज देण्याचा उद्देश आहे. योजनेच्या प्रक्रियेदरम्यान करोनाचे संकट कोसळल्याने अनेक पात्र शेतकऱ्यांच्या खात्याचे प्रमाणीकरण झाले नाही. त्यामुळे योजनेत पात्र असूनही कर्ज खात्यावर रक्कम दिसत असल्याने अनेक शेतकऱ्यांना बँकांकडून पीक कर्ज नाकारण्यात येत आहे.

कारवाईचे कृषिमंत्र्यांचे निर्देश 

मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे. थकबाकीचा विचार न करता, पीक कर्ज द्यावे. टाळाटाळ करणाऱ्या बँका व बँकांच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी दिला. कोणीही शेतकरी कर्जापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश कृषिमंत्र्यांनी विभागीय आढावा बैठकीत दिले आहेत.

* पश्चिम वऱ्हाडातील अकोला जिल्हय़ात एक लाख ४२ हजार ५०० शेतकऱ्यांसाठी ११४० कोटी रुपयांचे पीक कर्ज करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

* त्यापैकी आतापर्यंत २२ हजार ८८२ शेतकऱ्यांना २२७.७७ कोटींचे कर्ज वितरित करण्यात आले.

* कर्ज वाटपासाठी शेतकऱ्यांच्या निश्चित केलेल्या संख्येच्या १६ टक्के शेतकऱ्यांनाच आतापर्यंत कर्ज देण्यात आले. कर्ज वाटप उद्दिष्ट रकमेच्या २० टक्के कर्ज वाटप झाले आहे.

* बुलढाणा जिल्हय़ात तीन लाख ६२ हजार ८२८ शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्यासाठी २४६० कोटींचे उद्दिष्ट ठरविण्यात आले. त्यापैकी आतापर्यंत २५ हजार ७२१ शेतकऱ्यांना १९० कोटींचे कर्ज देण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2020 3:13 am

Web Title: peak loan disbursement at a slow pace in the west abn 97
Next Stories
1 रायगड जिल्ह्याला चक्रीवादळाचा जोरदार तडाखा
2 प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे मोठी जिवीत हानी टळली
3 पालघरला चक्रीवादळाची हुलकावणी
Just Now!
X