पेण येथील श्री गणेश मुर्तीकारांना दिलासा देणारी बातमी आहे. पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या पाठपुराव्यानंतर गणेशमूर्ती कार्यशाळा सुरु कऱण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. मात्र गणेशमूर्ती कार्यशाळांमध्ये सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कची बंधने पाळावी लागणार आहेत.

पेण तालुक्यात गणेशमूर्ती बनवणाऱ्या पाचशे कार्यशाळा आहेत. यात जवळपास १५ हजार लोक काम करतात. दरवर्षी शहरात २० ते २५ लाख गणेशमूर्ती तयार केल्या जातात. ज्या देशाविदेशात पाठविल्या जातात. मात्र टाळेबंदीमुळे सध्या गणेशमूर्ती बनविण्याचे काम जवळपास दिड महिना बंद होते. यामुळे मुर्तीकार, कार्यशाळा चालक आणि कामगारांचे मोठ आर्थिक नुकसान होत आहे. ही बाब लक्षात घेऊन टाळेबंदीतून पेणच्या गणेशमूर्ती व्यवसायाला सूट दिली जावी अशी मागणी केली जात होती.

रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांची भेट घेऊन गणेशमूर्ती व्यवसायाला टाळेबंदीतून सूट देण्याची विनंती करण्यात आली होती. गणेशमुर्तीकारांच्या या मागणीची  दखल पालकमंत्री तटकरे यांनी घेतली. प्रशासकीय यंत्रणांना या संदर्भात तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले. दोन दिवसात या प्रस्तावावर निर्णय घेण्यात आला. यानुसार आता विशेष बाब म्हणून पेणच्या गणेशमूर्ती कार्यशाळांना टाळेबंदीतून सूट देण्यात आली आहे. मात्र कार्यशाळांमध्ये काम करणाऱ्या कारागिरांना मास्क लावणे, सॅनिटायझरचा वापर करणे आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करणे बंधनकारक असणार आहे.