ठेवीदारांचे पैसे परत देण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याचे आदेश

रायगड जिल्ह्यतील पेण अर्बन सहकारी बँकेतील घोटाळा प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी. अंमलबजावणी संचालनालय तसेच गृह विभागाने या प्रकरणी लक्ष घालून घोटाळ्यातील कोणीही दोषी सुटणार नाही याची दक्षता घ्यावी असे आदेश मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दिले. या बँकेतील ठेवीदारांचे पैसे परत मिळण्यासाठी बँकेच्या मालमत्ता  विकण्याच्या दृष्टीने कृती आराखडा तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी  संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

पेण अर्बन सहकारी बँकेत झालेल्या घोटाळ्याचा फटका हा बँकेच्या सुमारे अडीच लाख ठेवीदारांना बसला आहे. अनेकांनी आपल्या आयुष्याची पुंजी यात गुंतविली आहे. या ठेवीदारांना न्याय मिळण्याच्या दृष्टीने या प्रकरणी गंभीर कार्यवाही होणे गरजेचे आहे. दोषींकडून वसुली करणे, त्यांच्या मालमत्ता जप्त करणे, बँकेच्या मालमत्तांची विक्री करणे यासंदर्भात सर्व संबंधित विभागांनी कठोरपणे कारवाई करावी, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.