मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार पेण अर्बन बँकेतील १० हजार रुपयांपर्यंत ठेवी असलेल्या ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत करण्याची कार्यवाही आजपासून (मंगळवार) सुरू होणार आहे. बँकेतील घोटाळा उघडकीस आल्यानंतर नेमण्यात आलेल्या प्रशासक मंडळातर्फे ही माहिती देण्यात आली. यामुळे छोटय़ा ठेवीदारांना लवकरच त्यांचे पसे मिळणार आहेत. ७५ वर्षांची परंपरा असलेल्या पेण अर्बन बँकेत सुमारे ७५० कोटी रुपयांचा घोटाळा झाला असल्याचे पाच वर्षांपूर्वी उघडकीस आले. दोन लाख ग्राहकांचे कोटय़वधी रुपये बँकेत अडकले. पेण अर्बन बँक ठेवीदार संघर्ष समितीतर्फे यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान १० हजार रुपये व त्यापेक्षा कमी ठेव असलेल्या बँकेच्या ठेवीदारांना रक्कम वाटप करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्देशाची अंमलबजावणी न्यायालयाच्या निर्देशापासून चार आठवडय़ांत करावयाची आहे. त्यानुसार ही कार्यवाही मंगळवारपासून सुरू होणार आहे. पेण अर्बन बँकेतील ज्या ठेवीदारांची सर्व खात्यांतील एकूण रक्कम १० हजार रुपये किंवा त्यापेक्षा कमी असेल अशा ठेवीदारांनी आपले आधार कार्ड, इलेक्शन कार्ड, पॅन कार्ड, यापकी एक ठेवीदार मृत पावला असल्यास त्याचा मृत्यूचा दाखला, वारसाचे प्रमाणपत्र, इन्डेन्मिटी बॉन्ड, अज्ञान असल्यास जन्मतारखेचा दाखला, कंपनी, भागीदारी फर्म असल्यास फर्मचा ठराव, प्रोप्रायटरी फर्मसाठी आवश्यक कागदपत्रे, सहकारी सोसायटी किंवा ट्रस्टचे ठराव, संयुक्त खाते असल्यास सहखातेदारांची संमतीपत्रे, पावती हरवली असल्यास एफआयआरची प्रत इत्यादी कागदपत्रे, मुदतठेव खात्यांची ठेव पावती संबंधित शाखेत जमा करावी लागणार आहे. जे ठेवीदार केवायसी नॉम्र्सची पूर्तता करणार नाहीत, त्यांची ठेव परत देता येणार नाही, अशी माहिती प्रशासक मंडळातर्फे देण्यात आली.
यात १० हजारांपर्यंत ठेवी असलेले सुमारे एक लाख ३४ हजार ठेवीदार आहेत. ठेवीदारांच्या आणि प्रशासक मंडळाच्या सुविधेसाठी ग्राहकांच्या आडनावानुसार पसे देण्यासाठी तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत. ८ सप्टेंबर रोजी इंग्रजी अद्याक्षर ए ते ईपर्यंतच्या ग्राहकांना मिळतील. ९ तारखेला एफ ते जे, १० तारखेला के ते ओ, ११ तारखेला पी ते एस आणि १२ सप्टेंबर रोजी टी ते झेड अशी आडनावाची अद्याक्षरे असलेल्या ठेवीदारांना पसे देण्यात येतील, असे प्रशासक मंडळाच्या वतीने सांगण्यात आले.