वाढत्या करोनाला रोखण्यासाठी सरकार कडक टाळेबंदी लागू करण्याची दाट शक्यता असली तरी वैद्यकीय तज्ज्ञांमध्ये टाळेबंदी लागू करण्यावरून दोन तट पडले आहेत. एका गटाच्या म्हणण्यानुसार टाळेबंदीचा आता काहीच उपयोग नाही. उलट टाळेबंदी केल्यास करोना वाढेल तर दुसऱ्या गटातील डॉक्टरांचे म्हणणे आहे, लोकांचा जीव वाचविण्यासाठी टाळेबंदी हाच आत्ताच्या घडीला एकमेव उपाय आहे. तर राज्याच्या कृतीदलाचे प्रमुख डॉ. संजय ओक यांच्या म्हणण्यानुसार लोकच सरकारला टाळेबंदी लावायला हतबल करत आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने करोनाचा फैलाव रोखण्यासाठी दिवसा जमावबंदी व रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. शनिवार – रविवार टाळेबंदी करून पाहिली तरीही लोकांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. वारंवार सांगूनही लोक मास्क वापरत नाहीत, गर्दी टाळत नाहीत तसेच अनावश्यक फिरत आहेत. परिणामी करोना वेगाने आपले हातपाय पसरत चालला आहे. राज्यात गेले आठवडाभर रोज ५० हजाराहून अधिक करोना रुग्ण सापडत आहेत तर दोनशे-तीनशे लोकांचे मृत्यू होत आहेत. मुंबईतही रोज दहा हजाराच्या आगेमागे रुग्ण सापडत असून राज्यात बेड मिळण्यासाठी अक्षरश: रुग्णांचे हाल होत आहेत. राज्य सरकारने केंद्र शासनाकडे ऑक्सिजन तसेच व्हेंटिलेटरची मागणी केली असून केंद्राकडून पुरेशा लसी मिळत नसल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे म्हणणे आहे. या लस पुरवठ्यावरून आता राज्य सरकार व केंद्रातील नेत्यांमध्ये राजकीय नाट्य रंगू लागले असतानाच करोना आटोक्यात येण्याची काही चिन्हे दिसत नसल्यामुळे राज्य सरकारने कडक टाळेबंदीचा इशारा देत सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले होते.

या पार्श्वभूमीवर खासगी व शासकीय डॉक्टरांची कडक टाळेबंदीबाबत भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता बहुतेक डॉक्टरांनी या विषयावर न बोलणे पसंत केले. काहींनी नाव न छापण्याच्या अटीवर टाळेबंदी योग्य नसल्याचे तसेच जास्त नुकसान करेल असे मत व्यक्त केले. एका डॉक्टरच्या म्हणण्यानुसार मध्यंतरी अकोला व अमरावतीमध्ये पंधरा दिवस टाळेबंदी लागू करूनही तेथे काहीही उपयोग झाला नव्हता. उलट करोना वाढतच गेल्याचे त्यांचे म्हणणे आहे. एकीकडे राज्याचे आर्थिक कंबरडे पूर्ण मोडले आहे. हातावर पोट असणाऱ्यांची अवस्था अधिक वाईट होण्यापलीकडे टाळेबंदीमधून काहीच साध्य होणार नाही. टाळेबंदीला शास्त्रीय आधार काय, असा सवालही एका डॉक्टरने केला आहे.

या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी आरोग्य महासंचालक व राज्याचे प्रमुख करोना विषयक सल्लागार डॉ सुभाष साळुंखे यांनी करोना रोखण्यासाठी आज टाळेबंदीला दुसरा पर्याय काय आहे असा सवाल करत टाळेबंदी लागू झाली पाहिजे, अशी सुस्पष्ट भूमिका मांडली. राज्याची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. गोरगरीब लोकांचे हाल होणार हे मान्य आहे पण त्याहीपेक्षा आज लोकांचे जीव वाचणे जास्त महत्वाचे आहे, असे डॉ सुभाष साळुंखे यांनी सांगितले. करोनाची साखळी तोडली तर वाढणारा करोना रोखता येईल तसेच वैद्यकीय व्यवस्था निर्माण करायला सरकारला काहीसा अवधी मिळेल. काल सकाळी पुण्यात माझ्याच ओळखीच्या तीन रुग्णांना खाटा मिळाव्या यासाठी तीन सनदी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून प्रयत्न केल्यानंतर रात्री उशीरा कसेतरी रुग्णालयात दाखल करता आले. ही जर माझ्यासरख्याची अवस्था असेल तर सर्वसामान्यांची काय अवस्था असेल असा सवाल करत सरकारपुढे टाळेबंदीशिवाय आज तरी पर्याय नाही, असे डॉ साळुंखे म्हणाले.

कृती दलाचे प्रमुख डॉ संजय ओक म्हणाले लॉकडाउन करा पण मिनी लॉकडाउन हे काय प्रकरण आहे ते कळू शकत नाही. हे म्हणजे एखाद्या हॉटेलमध्ये जाऊन सुप – टू बाय थ्री करा सांगण्यासारखे आहे. अटकाव करा पण तो शेजाऱ्याला करा, मला ऑफिसला जाऊ द्या हे सांगण्यासरख आहे, असे म्हणत डॉ ओक यांनी मिनी लॉकडाउनची अप्रत्यक्षपणे खिल्ली उडवली. टाळेबंदीचा निर्णय हा टास्क फोर्स घेऊ शकत नाही. ती वैद्यक विश्वाची जबाबदारी नाही. टाळेबंदीचे सामाजिक, नैतिक, आर्थिक आदी परिणामांचा विचार करून शासन त्याबाबत निर्णय घेईल असे सांगून डॉ ओक म्हणाले, सरकार लोकांवर टाळेबंदी लादत नाही तर लोकच शासनाला टाळेबंदी लागू करण्यासाठी हतबल करत आहे. महापालिकेच्या एका ज्येष्ठ अधिष्ठात्यांच्या म्हणण्यानुसार मुंबईत टाळेबंदीची गरज नाही, मात्र राज्याची परिस्थिती लक्षात घेता अन्यत्र टाळेबंदी लागू करणे योग्य ठरेल. टाळेबंदी लागू केल्यास त्या काळात आरोग्य व्यवस्था जास्तीतजास्त मजबूत करण्याला प्राधान्य दिले पाहिजे असेही त्यांनी सांगितले.

‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ ( आयएमए) च्या ठाणे शाखेचे अध्यक्ष डॉ. संतोष कदम यांनी टाळेबंदीचे ठाम समर्थन केले. टाळेबंदीमुळे करोनाची साखळी तर तुटेलच शिवाय सध्या रुग्णालयांवर असलेला ताण कमी होईल. सध्या उपचार घेत असलेले रुग्ण बरे झाल्यामुळे रुग्णालयात खाटा उपलब्ध होतील. आज रुग्णालयात खाटा उपलब्ध नाहीत तसेच ऑक्सिजनसाठी मारामारी सुरु आहे. आरोग्य यंत्रणा प्रचंड तणावाखाली असून लॉकडाउनमुळे त्यांनाही पुरेशी तयारी करायला वेळ मिळेल असेही डॉ. संतोष कदम यांनी सांगितले.