शिवसेनेने जे प्रश्न उचलून धरले त्याबद्दल भाजपाने मान्यता दर्शवली. तसेच आम्ही दोन्ही पक्ष हे समविचारी पक्ष आहोत त्यामुळे आम्ही युतीला होकार दिल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. राम मंदिर झाले पाहिजे ही दोन्ही पक्षांची भूमिका आहे आणि हाच युतीसाठीचा मुख्य मुद्दा होता. रामराज्य चालवायचं असेल तर राम मंदिर झालंच पाहिजे ही शिवसेनेची भूमिका आहे.

नाणारबद्दल आमचं म्हणणं भाजपानं ऐकून घेतलं. लोकांना नको असेल तर तो प्रकल्प तिथे प्रकल्प होणार नाही अशी भूमिका भाजपाने घेतली ही गोष्ट मनाला भावली. लोकांचं हित पाहूनच प्रकल्प साकारला गेला पाहिजे ही शिवसेनेची भूमिका घेतली. लोकहित जपण्याबाबत शिवसेनेने ज्या ज्या गोष्टी मांडल्या त्या भाजपालाही मान्य आहेत त्यामुळेच आम्ही एकत्र आलो. 25 वर्षे आमची युती होती. मध्यंतरी मतभेद झाले ते आम्ही लक्षात ठेवतो आहोत कारण असे कटु अनुभव येऊ नयेत अशी अपेक्षा आहे. आम्ही नवी सुरूवात करतो आहोत. आम्ही दोन्ही पक्षांनी एकत्र यावं ही जनभावना होती त्यामुळे जनभावना लक्षात घेऊन आम्ही एकत्र आलो आहोत असे उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

दोन्ही पक्ष एकत्र येत आहेत ही एक नवी सुरूवात आहे. आमची युती ही विचारांच्या पायावर झालेली युती आहे. हिंदुत्त्व हा दोन्ही पक्षांचा पाया आहे. दोन्ही पक्ष वेगळे असले तरीही दिशा एकच आहे. त्यामुळे आमच्यावर लोक पुन्हा एकदा विश्वास टाकतील असा विश्वास आम्हाला आहे असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. पुलवामा येथे शहीद झालेल्या जवानांना उद्धव ठाकरे यांनी आदरांजलीही वाहिली.