हिंगोली येथील बनावट नोटा प्रकरणात यवतमाळ जिल्ह्यातील पुसदनंतर पांढरकवडा कनेक्शनही समोर आले आहे. प्रहार जनशक्‍ती पक्षाचे पांढरकवडा-वणी जिल्हाध्यक्ष विलास पवार यास हिंगोली पोलिसांनी सोमवारी रात्री ताब्यात घेतले. तसंच विलास पवारचा या प्रकारणात थेट सहभाग आहे की नोटांचा विनियोग करण्यात मदत करायचा याचा छडा पोलीस लावत आहेत.

३ सप्टेंबर रोजी एटीएस व उपविभागीय पोलीस अधिकार्‍यांच्या पथकाने हिंगोली शहरातील आनंद नगर भागात छापा टाकून बनावट नोटांचा कारखाना उघडकीस आणला होता. यातील प्रमुख आरोपी संतोष सुर्यवंशी याचे विलास पवारशी असलेले मैत्रीपूर्ण संबंध पोलिसांच्या चौकशीत समोर आले. पवारवरही विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. यवतमाळ येथील स्थानिक गुन्हे शाखेने दुचाकी चोरीच्या एका प्रकरणातही चौकशीसाठी त्याला ताब्यात घेतले होते. तसेच शस्त्र कायद्यान्वये ही गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर येत आहे.

विलास पवार हा मूळचा यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील असून सध्या पांढरकवडा येथे स्थायिक झाला आहे. वाळू तस्करी प्रकरणात कथित सीएची ३५ लाखांची फसवणूक व १ कोटींच्या अन्य एका प्रकरणासह बनावट पदव्यांच्या प्रकरणातही पवारचे नाव चर्चेत होते. हिंगोली पोलिसांनी बनावट नोटा प्रकरणात सोमवारी पांढरकवडा येथून ताब्यात घेतले. या प्रकरणात यापूर्वी संतोष सुर्यवंशी, छाया भुक्‍तर या मुख्य आरोपीनंतर पुसदच्या शेख इमरान व विजय कुरूडेला अटक केली होती. हिंगोली ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्‍वर वैजणे यांनी यापूर्वीही त्यांनी अनेक गुन्हे उघडकीस आणले होते. हिंगोलीतील बनावट नोटा कारखान्यावर छापा टाकून यातील चार आरोपी यापूर्वीच ताब्यात घेतले असून नोटांचा विनियोगात इतर बड्यांचा समावेश आहे किंवा नाही याबाबत त्यांच्याकडून सखोल चौकशी केली जात आहे.