या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अपघातग्रस्त गाडीतील विखुरलेली फळे पळविण्यासाठी नागरिकांची झुंबड; टोल प्राधिकरणाचे कर्मचारीही लुटीत सहभागी

कोकणातील आंबे घेऊन जाणाऱ्या वाहनाला पुणे-नाशिक मार्गावर चंदनापुरी घाटातील एका वळणावर मध्यरात्री अपघात झाला. हे वाहन उलटल्यामुळे त्यात असलेल्या हजारो आंब्यांचा सडाच रस्त्यावर विखुरला गेला आणि त्यामुळे आणखी पाच वाहनांचा अपघात घडून एकाचा मृत्यूही झाला. पण या भीषण दुर्घटनेने निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी मदत करण्याऐवजी स्थानिक, प्रवासी यांच्यासह टोल कर्मचाऱ्यांनीही माणुसकी विसरत मनसोक्त आंबालुटीचा प्रताप केला.

पुण्याहून नाशिकच्या दिशेने गुरुवारी मध्यरात्रीनंतर  आंबे घेऊन जाणारी गाडी चंदनापुरी घाटातील एका धोकादायक वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने उलटली. त्यामुळे त्यातील आंबे सर्वत्र रस्त्यावर विखुरले. या वाहनाला घाटमाथ्यावरून भरधाव वेगाने आलेले दुसरे वाहनही धडकले. या दोन्ही अपघातग्रस्त वाहनांपासून स्वत:ला वाचविण्याच्या प्रयत्नात एक कंटेनर थेट रस्त्यावरील दुभाजकावर जाऊन अडकून पडला.

एवढे होत नाही तोच एक मोटारसायकलस्वार थेट या वाहनांच्या खाली गेला. त्यापाठोपाठ आणखी एक टेम्पो भरधाव येऊन या वाहनांना धडकला आणि रस्त्यात आडवा झाला. त्यामुळे रस्त्याचा एक मार्ग वाहतुकीला पूर्णत: बंद झाला. या अपघातांमध्ये कैलास अशोक पाटील (रा. शहापूर, ता. अमळनेर, जि. जळगाव) असे ठार झालेल्याचे तर उमेशकुमार आणि अजयसिंग रमेशसिंग अशी जखमींची नावे आहेत.

या घटनास्थळापासून थोडय़ा अंतरावर टोल नाका आहे. नुकतेच चौपदरीकरण झालेल्या या मार्गावर टोल प्राधीकरणाचे कर्मचारी मदतीसाठी तैनात आहेत. या कर्मचाऱ्यांनी अपघातानंतर लगेचच पोलिसांना याची माहिती देत हे वाहन रस्त्यातून बाजूला घेण्याची कार्यवाही करणे आवश्यक होते. मात्र ते न झाल्यामुळे सकाळपर्यंत आंबे पळविण्यासाठी गोणी, भांडी आणि पिशव्या घेऊन येणाऱ्या नागरिकांची झुंबड उडाली होती.

पोलिसांनादेखील आंबे नेणारे जुमानत नव्हते. तब्बल पंधरा लाख रुपयांचा आंबा काही तासांच्या आत नागरिकांनी पळवून नेला.

गेल्या वर्षांची पुनरावृत्ती..

गेल्या वर्षी याच मार्गावर रत्नागिरीहून तीन लाख रुपये किंमतीचे आंबे घेऊन जाणाऱ्या एका वाहनाला अपघात झाला होता. त्या वेळीही जखमी अपघातग्रस्तांना मदत करण्याऐवजी लोकांनी काही वेळातच या वाहनातील सर्वच आंबे पळविले होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: People collection mangoes from accident car
First published on: 25-05-2018 at 03:40 IST