X

बीटी कपाशीने घात केल्याने अतिविषारी कीटकनाशकाचा वापर

अनावश्यक अशी अतिविषारी आणि अतिमहागडी औषधी शेतकऱ्यांच्या माथी मारली

बीटी कपाशीने धोका दिल्यामुळे शेतकऱ्यांवर कीटकनाशक फवारणीची वेळ येऊन यवतमाळ जिल्ह्य़ात १९ आणि विदर्भात जवळपास ३२ शेतकऱ्यांचे हकनाक बळी गेल्याचे चित्र असताना कीटकनाशकापायी शेतकऱ्यांनी तीनशे कोटी रुपयांवर खर्च केल्याची माहितीही समोर आली आहे. कीटकनाशक कंपन्यांच्या विविध प्रलोभनापायी अनेक विक्रेत्यांनी  मनाई असलेली तसेच अनावश्यक अशी अतिविषारी आणि अतिमहागडी औषधी शेतकऱ्यांच्या माथी मारली.

जिल्ह्य़ात २०१६ च्या जुल, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात सहा शेतकऱ्यांचे फवारणीपायी बळी गेले होते. पण, त्यांची कुणी दखल घेतली नाही. २०१७ च्या या तीन महिन्यासह ऑक्टोबर अशा चार महिन्यांत ७५० च्या वर शेतकरी उपचार घेत आहेत. यवतमाळ जिल्ह्य़ात कीटकनाशक उत्पादक कंपन्याची जवळपास ४० उत्पादने बाजारात आहेत. चारशे ते १५ हजार रुपये प्रतिलीटर दराने अतिजहाल, जहाल आणि सामान्य विषारी औषधे विकली जातात. ‘पोलीस’ हे औषध ऊसावरील कीड नाहीशी करण्यासाठी वापरल्या जाते. कपाशीसाठी वापरू नये, असा तज्ज्ञांचा सल्ला असला तरी ते मोठय़ा प्रमाणात वापरले गेले.

अधिक माहिती घेतली असता समजले की,  काही औषधांची चारशे मिलीलीटरमध्ये एका एकरात फवारणी होते. काही भुकटी स्वरूपातील ओषधी तीनशे ग्रॅम लागतात. यवतमाळ जिल्ह्य़ात साडेचार लाख हेक्टर क्षेत्रात बीटी कपाशीची लागवड झाली आहे. सोयाबीनची लागवड साडेतीन लाख हेक्टर क्षेत्रात झाली आहे. बीजी २ कपाशीने प्रतिकार शक्ती गमावली आहे. त्यामुळे पिकांवर बोडअळीचा मोठय़ा प्रमाणात प्रादुर्भात झाला आहे. बोगस बियाणे विकल्या गेल्याची शक्यता त्यामुळे व्यक्त होत आहे. सोयाबीन पिकावरही उंटअळीचा प्रकोप झाला आहे. पिके वाचवण्यासाठी शेतकरी अधाशासारखी सारासार विचार न करता ‘मरता क्या न करता’ म्हणीप्रमाणे अतिविषारी व महागडी कीटकनाशक औषधी  फवारत आहेत. त्यांना ना शासनाने, ना कृषी केंद्रानी, ना कुण्या संघटनेने फवारणी कीट पुरवली आहे. आता हाहाकार झाल्याने १५ हजार किटस पुरवल्या जातील अशी घोषणा सरकारने केली आहे.

जिल्ह्य़ात बी, बियाणे खते आणि कीटकनाशकांची उलाढाल अब्जावधी रुपयांची होते. त्यात कीटकनाशकांचा खप साडेतीनशे ते चारशे कोटी रुपयांपर्यंत जातो. या व्यवसायाइतका प्रचंड नफा दुसऱ्या व्यवसायात कदाचित असेल. असेही एका कृषी साहित्य विक्रेत्याने सांगितले.

रक्तातील विष तपासण्याची सोय नाही

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रक्तातील विष तपासणीची व्यवस्था पॅथालॉजीत नाही. बाहेरुन तपासणी करून आणावी लागते. दर २४ तासानंतर तपासणी जरुरी असते. खासगी पॅथालॉजीतून तपासणी केली तर शेतकऱ्यांला साडेतीनशे रुपये द्यावे लागतात, अशी माहिती जनमंचचे सदस्य प्रा.घनश्याम दरणे यांनी येथे दिली.

वाचा / प्रतिक्रिया द्या
Outbrain