खान्देशच्या घामातूनच गुजरातचा विकास झाला असून उत्तर महाराष्ट्रातील भाजपच्या उमेदवारांना निवडून दिल्यास लोकांच्या याच मेहनतीतून खान्देशही समृद्ध करून दाखविणार, अशी ग्वाही भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी दिली. महाराष्ट्रातून दिल्लीत गेलेले कृषिमंत्री शरद पवार यांना शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविता आलेल्या नाहीत, हे दुर्दैव आहे. महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांनी इतकी वर्षे केले काय, असा प्रश्न करून काँग्रेसला साठ वर्षे दिली. याउलट आम्हाला फक्त साठ महिन्यांसाठी सत्ता द्या. देशाचा विकासात्मक कायापालट करून दाखवू, असा दावाही या वेळी मोदींनी केला.
नंदुरबार आणि धुळे लोकसभा मतदारसंघांतील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मंगळवारी आयोजित जाहीर सभांमध्ये ते बोलत होते. या वेळी त्यांनी स्थानिक समस्यांसह राष्ट्रीय पातळीवरील मुद्देही मांडले. दिल्ली-मुंबई औद्योगिक पट्टय़ाचा लाभ महाराष्ट्रासह शेजारच्या गुजरातलाही होणार आहे. यामुळे मनमाड-इंदूर रेल्वे मार्गासह या भागातील शेती आणि अन्य उत्पादनांवर आधारित उद्योगांनाही चालना मिळेल, असा आशावाद मोदी यांनी धुळे येथील सभेत व्यक्त केला. ‘अहिराणी मायले मन्हा राम राम’ अशी अहिराणीतून भाषणाची सुरुवात करून त्यांनी उपस्थितांच्या टाळ्या मिळविल्या. देशभरातील निवडणुकीचा काय निकाल लागणार आहे ते गांधी मायलेकांना आणि शरद पवार यांनाही कळले आहे. त्यामुळेच त्यांचा भाषणातील तोल ढळला असल्याची टीका त्यांनी केली. या भागात कापूस पिकतो. मग तो गुजरातेत नेणे शेतकरी का पसंत करतात, असा प्रश्न करून मोदी यांनी शेतकऱ्यांच्या भावनांना हात घातला. महायुतीचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील हुशारीचे कौतुक करत अशा शल्यचिकित्सकाचा उपयोग प्रसंगी गुजरातमध्येही करू, असे त्यांनी सांगितले. ज्यांनी तुम्हाला न्याय दिला नाही त्यांना मतपेटीतून शिक्षा घडवा. तुमच्या तपश्चर्येला निर्थक ठरविणार नाही. विकास करून तुमचे ऋण फेडणार, अशी साद त्यांनी घातली.
नंदुरबार येथील प्रचारसभेत हीना गावित यांना विजयी करण्याचे आवाहन करतानाच आदिवासींच्या समस्यांवरून काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. साठ वर्षांत काँग्रेसला आदिवासींचा विकास करता आला नाही. उलट एकाच घराण्याचा त्यांनी विकास केल्याचा आरोप मोदींनी केला. आदिवासी आणि मराठी भाषेतून त्यांनी नंदुरबारमध्ये भाषणाची सुरुवात केली. देशातील ४० टक्के आदिवासींची संख्या असलेल्या मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांतील आदिवासींचा विकास इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक झाला आहे. नंदुरबार आणि धुळे या दोन्ही ठिकाणी दुपारच्या कडक उन्हात झालेल्या सभांना मोठी गर्दी होती.