13 December 2019

News Flash

सांगलीतील इच्छुकांना ‘वंचित’चा पर्याय

लोकसभेत चांगले मतदान झाल्याने ओढा वाढला

(संग्रहित छायाचित्र)

दिगंबर शिंदे

लोकसभा निवडणूक निकालानंतर जिल्ह्य़ाचे राजकीय आडाखे बदलले असून राजकीय पटलावर यापूर्वीचा दोन्ही काँग्रेसअंतर्गत असलेला सत्तेचा संघर्ष नव्या वळणावर पोहचला असतानाच बहुजन वंचित आघाडीचा तिसरा पर्याय लाभला आहे. आजपर्यंत सत्तेपासून वंचित असलेल्यांना सत्तेचा वाटा मिळावा यासाठी उदयास आलेल्या वंचित आघाडीतून नव्यांना संधी दिली जाईल अशी अपेक्षा होती. पण या आघाडीकडेही असलेला ओढा हा अन्य पक्षांकडून डावलेल्यांचा आहे.

लोकसभेच्या रिंगणात यावेळी प्रथमच काँग्रेस चिन्हाविना लढली असली तरी आता विधानसभेला आपले अस्तित्व दाखविण्यासाठी पराकाष्ठा करावी लागण्याची चिन्हे आहेत. याचबरोबर राष्ट्रवादीचीही तशीच स्थिती झाली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांची कोंडी करण्याची व्यूहरचना राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या माध्यमातून केली जात असतानाच वाळव्यातील उमेदवारीचा भाजपमधील संघर्ष कोणत्या वळणावर जाणार हे आता काही दिवसातच स्पष्ट होणार आहे. भाजपकडून इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील की राज्यमंत्री खोत यांच्याकडून पुत्र सागर खोत यांना पुढे केले जाते हे रंजक ठरणार आहे.

दुसऱ्या फळीतील नेत्यांना विधानसभेच्या उमेदवारीचा आणि सक्रिय नसला तरी आतून पाठिंब्याचा शब्द दिलेल्या वंचित आघाडीची विधानसभेची रणनीती काय असणार याची उत्सुकता जशी महाआघाडीला आहे तशीच महायुतीला लागली आहे. बहुजन वंचित आघाडीचे गोपीचंद पडळकर यांना लोकसभा निवडणुकीमध्ये तीन लाखांहून अधिक मते मिळाल्याने अन्य पक्षात सत्तेपासून वंचित राहिलेल्यांची पावले वंचितच्या दिशेने पडत असली तरी अद्याप सावध भूमिका घेऊन नांदत्या घरातच डाळ शिजते का? हे पाहण्यासाठी सबुरीचे धोरण स्वीकारले जात आहे.

लोकसभा निवडणुकीत यावेळी तिरंगी लढत झाली. भाजप विरुद्ध स्वाभिमानी अशी वरकरणी लढत वाटत असली तरी ही लढत पारंपरिक काँग्रेस आणि भाजपा अशीच होती. महाआघाडीतील घटक पक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला जागेसह उमेदवारही काँग्रेसने पुरविला. या पारंपरिक लढतीला यंदा पडळकर यांच्या माध्यमातून वंचित आघाडीचा धारदार आणि टोकदार कोन लाभल्याने ही लढत चुरशीची झाली.

निवडणुकीत भाजपाने १ लाख ६० हजारांच्या मताधिक्याने ही लढत जिंकली असली तरी सार्वत्रिक लढतीसाठी प्रथमच मदानात उतरलेल्या विशाल पाटील आणि पडळकर यांनी घेतलेले मतदानही लक्षवेधी ठरले. ऐनवेळी मदानात उतरूनही प्रस्थापित असलेल्या भाजपला विजयासाठी झुंजावे लागले. आघाडीला पलूस-कडेगाव विधानसभा मतदार संघवगळता अन्य मतदार संघामध्ये मतदारांनी दुय्यम स्थान दिले.

विधानसभेसाठी हालचाली

या निवडणुकीचे परिणाम विधानसभा निवडणुकीवर पडणे स्वाभाविकच आहे. सांगली लोकसभा मतदार संघातील सहाही विधानसभा मतदार संघामध्ये वंचित आघाडीला चांगले मतदान झाले आहे. यामुळे विधानसभेसाठी वंचित आघाडीचा पर्याय उपलब्ध झाला असला तरी इच्छुकांनी अद्याप सावध भूमिका घेतली आहे.  प्रकाश शेंडगे हे जतमधून इच्छुक आहेत, तर त्यांचे बंधू जयसिंग शेडगे हे तासगाव-कवठेमहांकाळमधून इच्छुक आहेत. खानापूरमधून पडळकर बंधूपकी एखादा मदानात उतरण्याच्या तयारीत आहे, तर बाजार समितीचे माजी सभापती प्रशांत शेजाळ तासगाव-कवठेमहांकाळमधून संधी मिळते का याची चाचपणी करीत आहेत.

मात्र सांगली व मिरज मतदार संघात अद्याप वंचितच्या हालचाली उघड झाल्या  नसल्या तरी महाआघाडीची रणनीती कशी राहणार, उमेदवारीची संधी कोणाला मिळणार यावरच चित्र अवलंबून राहणार आहे. लोकसभेच्या प्रचारादरम्यान अनेक इच्छुकांना उमेदवारीचा शब्द देण्याबरोबरच आतून मदत करण्याची भूमिका वंचितकडून मांडण्यात आली होती.

जिल्हा परिषद या मिनी मंत्रालयात कार्यरत असलेले सदस्य पदाधिकारी विधानसभेला इच्छुक असतात आणि ते यशस्वीही होतात हा आजपर्यतचा इतिहास आहे. अगदी आर. आर. आबापासून शिवाजीराव नाईक व्हाया अजितराव घोरपडे यांच्यापर्यंत ही परंपरा कायम राहिली आहे.

आताही जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, सभापती ब्रम्हदेव पडळकर, तमणगोडा रवि पाटील, शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे याना आमदारकीची स्वप्ने पडू लागली आहेत. ही सर्व मंडळी भाजपाची असली तरी यापकी  देशमुख वगळता अन्य पदाधिकार्याना अगोदर उमेदवारीसाठी स्वपक्षात संघर्ष करावा लागणार आहे. पडळकर हे वंचित आघाडीकडून मदानात उतरण्याच्या तयारीत आहेत, तर रवि पाटील हे भाजपने उमेदवारी नाकारली तरच अपक्ष मदानात उतरतील, तर डोंगरे यांनी वंचितशी संधान साधले असून वारे कोणत्या दिशेने आहे यावरच त्यांची भूमिका राहील असे दिसते.

जागावाटप महत्त्वाचे

जिल्ह्य़ातील आठपकी जत, तासगाव, खानापूर, मिरज, सांगली आणि शिराळा हे मतदार संघ महायुतीकडे आहेत, तर पलूस-कडेगाव हा एकमेव मतदार संघ काँग्रेसकडे आणि तासगाव, वाळवा हे दोन मतदार संघ राष्ट्रवादीकडे आहेत. लोकसभेप्रमाणे विधानसभेसाठीही महायुती आणि महाआघाडी अशी लढत होणार हे गृहीतच असल्याने जागावाटपात कोणाला कोणते मतदार संघ मिळतात यावर पुढील तयारी अवलंबून आहे. सांगली, मिरज, जत, शिराळा या ठिकाणी सध्या भाजपचे आमदार आहेत, तर खानापूर हा मतदार संघ शिवसेनेकडे आहे. यावेळी विद्यमान आमदार ज्यांचे आहेत त्यांना मतदार संघ सोडले तर महायुतीमध्ये वाळवा, पलूस-कडेगाव आणि तासगावबाबतच चर्चा होऊ शकते. यातील तासगाव-कवठेमहांकाळ येथे अजितराव घोरपडे यांच्यासाठी आणि पलूस-कडेगाव येथे भाजपकडून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्यासाठी आग्रह धरला जाईल.

First Published on June 11, 2019 1:46 am

Web Title: people of sanglis choice of vanchit bahujan aghadi
Just Now!
X