त्रिशुला नदीचे पाणी प्रचंड प्रमाणावर हलले, पाण्याची अशी हालचाल कधी पाहिली नव्हती. या दरम्यानच जवळच्या पहाडातही प्रचंड आवाज झाला व थोडय़ाच वेळात मोठा आवाज होऊन नदीजवळील पहाडातून प्रचंड धुराळा उडाला. हे सर्व पाहून आम्ही सर्व हादरून गेलो. यानंतर काही वेळातच माहिती झाले की, नेपाळात प्रचंड भूकंप आला आहे. ते ऐकून आम्ही सारे हादरून गेलो, अशी नेपाळातील भूकंपाची माहिती येथील संतोष देशमुख यांनी लोकसत्ताला दिली.

येथील निर्माण फर्टलिायझरमध्ये काम करणारे संतोष देशमुख व त्यांचे इतर ठिकाणचे ४५ साथीदार २२ एप्रिलला सायंकाळी पर्यटन आणि कृषीविषयक माहितीसाठी नेपाळला गेले होते. आज आम्ही सारे यातून बचावून कसे परतलो, याचे आम्हालाच नवल वाटते. २५ एप्रिलला सकाळी न्याहारी आटोपल्यावर दुपारी १२.३० वाजातच्या सुमारास भूकंप झाल्याचे दिसले. नेपाळमधील पोखराजवळचा भाग खरे तर या भूकंपाचा केंद्रिबदू होता. पोखरा येथे मनोकामना देवीच्या मंदिरात दर्शनाला जाऊन आल्यावर खाली असलेल्या त्रिशुला नदीत उतरून निसर्गरम्य भाग पाहण्यात आम्ही मग्न झालेलो असतानाच प्रथम नदीतील पाणी असे काही हलले की, त्याची वेगळीच सळसळ जाणवली. नंतर प्रत्यक्ष नदीच हलताना दिसली व त्यानंतर नदीलगतचा प्रचंड पहाडही डोलत असल्याचे दिसले. त्यावेळी मोठा आवाज झाला आणि डोंगरातून प्रचंड धुराळा बाहेर पडला तेव्हा भयावह स्थिती झाली होती, असे ते म्हणाले.
मनोकामना देवीच्या दर्शनाला जातानाच रोपवेमध्ये काही भाविकांची प्रकृती बिघडली. आम्ही रस्त्यावर पडलेले मोठमोठे दगड स्वत: दूर करून आमच्या वाहनाचा मार्ग प्रशस्त केला व इतर पर्यटकांना सुद्धा तसे आवाहन केले. काठमांडूत सर्व हॉटेल्स व इतर इमारती ढासळलेल्या पाहून हादरून गेलो व कसे तरी भारतात पोहोचावे, अशी इच्छा तीव्र झाली होती. आम्ही ज्या हॉटेलमध्ये गेलो तेही मनोऱ्याप्रमाणे हलताना पाहिले तेव्हा तर अधिकच भीती अधिक वाटली. आम्हाला परतीच्या वाटेवर भगवान पशूपतिनाथाचे दर्शन झाले. या प्रवासात अमरावती, वर्धा, नांदेड आदी आपल्या भागातील अनेक प्रवासी आलेले होते. काठमांडू विमानतळावरून जेव्हा आमचे विमान दिल्लीकडे झेपावले तेव्हाच जीवात जीव आला, अशी आपबिती देशमुख यांनी विषद केली.

नेपाळचे लोक भारताच्या मदतीवर अवलंबून
सध्या फक्त काठमांडूवरच प्रसार माध्यमांचे लक्ष लागले आहे. मात्र, या भूकंपाने इतरही ग्रामीण भागात भयंकर हानी झाली आहे. तेथील लोकांशी बोलल्यावर ते म्हणाले, भारताने जर आम्हाला मदत केली तरच आमचे जीवन वाचू शकते. नेपाळी लोकांना भारतावर भरवसा असून मदतीची अपेक्षा आहे, असेही देशमुख म्हणाले.