बाजारात प्रचंड महागाई झाली असूनही जनता गप्प कशी काय बसली आहे. ‘अच्छे दिन’ येणार म्हणून सांगणाऱ्या केंद्र व राज्य सरकारला जनतेने आज जाब विचारण्याची वेळ आली आहे, असे काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सांगून आपण राज्यभर फिरून शिवसेना-भाजपचा खरा चेहरा जनतेसमोर आणणार असल्याचा इशारा दिला.
सावंतवाडी तालुका काँग्रेसच्या मेळाव्यात राणे बोलत होते. या वेळी जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, डॉ. जयेंद्र परुळेकर, संजू परब, जि. प. उपाध्यक्ष रणजीत देसाई, डॉ. मिलिंद कुलकर्णी व पदाधिकारी उपस्थित होते. मी गेली ३१ वर्षे सत्तेत होतो. या ३१ वर्षांनंतर आठ महिने आराम केला. कुडाळ-मालवणच्या मतदारांनी मला आराम करण्यास भाग पाडले. हा पराभव खिलाडूवृत्तीने घेत आता केंद्र व राज्य सरकारची थापेबाजी जनतेसमोर आणण्यासाठी राज्यभर दौरा करणार असल्याची राणे यांनी ग्वाही दिली.
राज्याचे मुख्यमंत्री थापेबाज आहेत. राज्याच्या अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद नसताना योजनांची घोषणाबाजी सुरू आहे. राज्याचा ११ हजार कोटींचा तुटीचा अर्थसंकल्प असताना घोषणाबाजी करणाऱ्या योजनांसाठी निधीची तरतूद कोठून करणार आहेत, हे मुख्यमंत्र्यांनी सांगावे असेही ते म्हणाले.
राज्याचा मुख्यमंत्री असताना माझ्या मंत्रिमंडळात आज भाजपच्या सरकारमधील मंत्री आहेत. त्यामुळे भाजपवाले पैसे घेतल्याशिवाय कामच करीत नाहीत, हे मला जवळून माहीत आहे. भाजपचे कपडे सांभाळण्याचे काम शिवसेनावाले करीत असल्याची टीका नारायण राणे यांनी केली.
बाजारात प्रचंड महागाई वाढली आहे. त्या जीवनावश्यक वस्तूंच्या भाववाढीचा लेखाजोखा नारायण राणे यांनी मांडून महागाई कमी करून ‘अच्छे दिन’ आणणाऱ्यांना जाब विचारायचे सोडून लोक गप्प कसे काय बसलेत, असा सवाल राणे यांनी केला. सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांचा खरपूस समाचार घेताना राणे म्हणाले, सरकारने आम्हाला पालकमंत्री नाही तर एक क्लार्क दिला आहे. हा थापेबाज माणूस पोकळ घोषणाबाजी करीत आकडेमोड करीत आहे. जे दिसेल ते माझेच, मीच केले असे सांगणाऱ्या केसरकर यांची, लोकांची दिशाभूल करणारी उदाहरणे त्यांनी मांडली. हा पांढऱ्या पायाचा माणूस असल्याने जिल्ह्य़ाचा विकास होणार नाही असे म्हणाले.
या वेळी डॉ. जयेंद्र परुळेकर, संजू परब, संदीप कुडतरकर, अॅड. दिलीप नार्वेकर, अन्वर खान यांनीही मार्गदर्शन केले.