अनाचारी, भ्रष्टाचारी राज्य कारभाराने मागच्या पंधरा वर्षांत महाराष्ट्र देशात पिछाडीवर गेला. ही पिछेहाट थांबवण्यासाठी दोन्ही काँग्रेसला बाजूला सारून भारतीय जनता पक्षाला एकहाती सत्ता द्या, असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकासाच्या प्रक्रियेत सहभागी होण्यातच महाराष्ट्राचे भले आहे, असे ते म्हणाले.
नगर शहर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार अभय आगरकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ बुधवारी सायंकाळी फडणवीस यांच्या सभेने झाला. या सभेत ते बोलत होते. आगरकर यांच्यासह खासदार दिलीप गांधी, आमदार बबनराव पाचपुते, गीता गिल्डा, सुरेखा विद्ये, सचिन पारखी, सुवेंद्र गांधी आदी पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.
फडणवीस यांनी शिवसेनेवर भाष्य करणे टाळले. दोन्ही काँग्रेसवर मात्र त्यांनी जोरदार टीका केली. ते म्हणाले, गेली पंधरा वर्षे राज्यात केवळ भ्रष्टाचार सुरू होता. भाजपने त्यावर वारंवार कोरडे ओढले. हा भ्रष्टाचार थांबवण्यासाठीच भाजपला राज्याची सत्ता हवी आहे. सत्ता हे पक्षाचे साध्य नाही, ते परिवर्तनाचे साधन आहे. त्यासाठीच राज्याची एकहाती सत्ता भाजपच्या ताब्यात द्या. ज्यांनी सत्तेच्या माध्यमातून ६० वर्षे देशाची लूट केली, तेच आता मोदी यांना शंभर दिवसांच्या सत्तेचा हिशोब मागत आहेत, हे जनतेने लक्षात घेतले पाहिजे.
मागच्या पंधरा वर्षांत महाराष्ट्राची मोठीच अधोगती झाली, अशी टीका फडणवीस यांनी केली. ते म्हणाले, उद्योग, शिक्षण, आरोग्य अशा सर्वच गोष्टींत महाराष्ट्र पिछाडीवर आहे. दोन्ही काँग्रेसच्या आघाडीने एकही क्षेत्र असे ठेवले नाही की, जेथे भ्रष्टाचार झाला नाही. यापुढच्या काळात ही गोष्ट महाराष्ट्राला परवडणारी नाही. नगर शहराची अवस्थाही महाराष्ट्रापेक्षा वेगळी नाही. सर्वच पातळ्यांवर शहाराची दैनावस्था झाली आहे. शहरात केवळ राजकारणच चालते, मात्र त्याने पोट भरत नाही. त्यासाठी विकासाची नितांत गरज आहे. तो साधण्यासाठीच पंतप्रधान मोदींना साथ देणे आवश्यक असून राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर जकातच नाही तर एलबीटी रद्द करू आणि खास प्रयत्न करून नगरमध्ये मोठे उद्योग आणू अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.
आगरकर यांनी या वेळी पक्षाच्या विजयाचा दावा केला. ते म्हणाले, गेल्या पंचवीस वर्षांत प्रथमच भाजपला शहरात विधानसभा निवडणुकीची संधी मिळाली. मात्र जनतेतून नगराध्यक्ष निवडताना भाजपने हा प्रयोग यशस्वी केला होता. त्या वेळी शिवसेनेचाच पराभव करून भाजने निवडणूक जिंकली होती, ही आठवण आगरकर यांनी करून दिली. राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप व शिवसेनेचे उमेदवार आमदार अनिल राठोड यांचा नामोल्लेख टाळून त्यांनी एकीकडे दादागिरी आहे तर दुसरीकडे फसवेगिरी आहे, अशी टीका केली. लोकांच्या संरक्षणाचा मुद्दा तर तद्दन खोटा असून ही लबाडीच आहे असे ते म्हणाले.
खासदार गांधी, पाचपुते यांचीही या वेळी भाषणे झाली. सुनील रामदासी यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. अजित फुंदे यांनी या सभेत राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केला.
शिवसेनेवर टीका नाही!
सभेनंतर पत्रकारांशी बोलताना फडणवीस यांनी आम्ही शिवसेनेवर टीका करणार नाही, हे स्पष्ट केले. तसेच मुख्यमंत्रिपदाबाबतचा निर्णय पक्षाची संसदीय समितीच घेईल, असे सांगून या समितीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही समावेश आहे, असे त्यांनी सांगितले. निवडणुकीनंतर राष्ट्रवादीशी युतीची शक्यताही त्यांनी स्पष्टपणे नाकारली.