छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद आणि राज्यातील विकास कामांवर जनतेने दाखवलेला विश्वास यामुळेच भाजपला विजय मिळाल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. नगरपालिका निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.

नगरपालिका निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाले आहे. याविषयी मुख्यमंत्री म्हणाले, राज्यासमोर अनेक आव्हाने होती. यावर तोडगा काढण्यासाठी सरकारने ज्या उपाययोजना राबवल्या त्यावर जनतेने निवडणुकीच्या माध्यमातून समाधान व्यक्त केले आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारनेही गोरगरीब आणि मध्यम वर्गांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. त्यामुळे मतदारांनीही आम्हाला भरभरुन मत दिल्याचे त्यांनी नमूद केले. प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे पाटील, मंत्रिमंडळातील सहका-यांनीही आम्हाला साथ दिली. सर्वात मह्त्त्वाचे म्हणजे कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे हा विजय शक्य झाला असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

नरेंद्र मोदींनी केलेल्या कौतुकावरही फडणवीस यांनी ट्विटरवर प्रतिक्रिया दिली. देश बदलत असल्याचा विश्वास मोदींनी जनतेच्या मनात निर्माण केला. निकालावरुन महाराष्ट्रातील जनता तुमच्या सोबत आहे असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

नगरपालिका निवडणुकांच्या प्रचारात मुख्यमंत्री अपवादानेच सहभागी होतात, असा आजवरचा अनुभव असला तरी यंदाच्या निवडणुकांमध्ये भाजपचे ‘स्टार प्रचारक’ म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभर दौरे सुरू केले होते. नगरपालिका निवडणुकीत भाजपची पिछेहाट झाल्यास त्याचा परिणाम आगामी महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्येही होऊ शकतो. हा धोका टाळण्याच्या उद्देशानेच मुख्यमंत्री गावोगावी दौरे करत होते. तसेच भाजपची पिछेहाट झाल्यास पक्षांतर्गत विरोधक सक्रीय होण्याची शक्यता असल्याने फडणवीस यांनी प्रचारसभांचा धडाकाच लावला होता. फडणवीस यांची ही रणनिती यशस्वी ठरल्याचे या निकालावरुन दिसते.