गेल्या काही दिवसांपासून एल्गार परिषद आणि कोरेगाव भीमा प्रकरण चर्चेत आहे. मंगळवारी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी पुन्हा एल्गार परिषदेच्या तपासाविषयी भाष्य केलं. शरद पवार यांनी एल्गार परिषदेला लक्ष्य करण्यामागे आणखी एका कारणाचा गौप्यस्फोट केला आहे. “एल्गार परिषदेतील महत्त्वाची गोष्ट म्हणजे शपथ घेण्यात आली. याचा अहवाल पोलिसांनी सादर केलेला आहे. भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघविरोधी शपथ कार्यक्रमात घेण्यात आली होती,” असं पवार यांनी म्हटलं आहे.

मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी एल्गार परिषद प्रकरणाच्या चौकशीमागील भूमिका मांडली. “एल्गार परिषद या प्रकरणाची चौकशी करण्याचा अधिकार राज्य सरकारलाही आहे. यामध्ये पोलीस दलातील पुणे पोलीस यांनी जो तपास केला. त्यामुळे महाराष्ट्र पोलीस दलाच्या लौकिकाला धक्का बसला आहे. त्यामुळे या प्रकरणात सहभागी असलेल्या महाराष्ट्र पोलीस आणि पुणे पोलिसांची चौकशी करण्यात यावी,” अशी मागणी शरद पवार यांनी केली.

आणखी वाचा – एल्गार परिषद : केंद्राला माहिती देणारा ‘तो’ खबऱ्या कोण?; पवारांचा सवाल

एल्गार परिषदेतील महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिथे समारोपावेळी शपथ घेण्यात आली.  विश्राम धाम पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकानं याविषयीचा अहवाल दिला आहे. जी शपथ घेण्यात आली ती शपथही शरद पवार यांनी वाचून दाखवली. तसेच या शपथेमध्ये संविधानाचा उल्लेख आहे, असं असताना तुरुंगात डांबले आहे. ते उपस्थित नव्हते त्यांनाही डांबले आहे. सत्तेचा कसा गैरवापर केला हे स्पष्ट होत आहे. त्यामुळे हे प्रकरण मला लोकांच्या समोर आणायचं आहे. राज्य सरकार काय तपास करायचा तो करेल, मी त्यात पडणार नाही,” असेही शरद पवार पवार यांनी स्पष्ट केलं.

आणखी वाचा – एल्गार परिषद : सुधीर ढवळेंना नामदेव ढसाळांच्या ‘या’ कवितेमुळे अटक करण्यात आली

काय होता शपथेचा मजकूर-

मी देशाच्या संविधानाचं आणि लोकशाहीचं रक्षण करेल. हे करताना स्वतःला विकणार नाही.
संविधान विरोधी असलेल्या भाजपा आणि संघाशी संबंधित पक्षाला मत देणार नाही.