प्रवीण तोगडीया यांची पंतप्रधान मोदींवर टीका

‘जीएसटी’साठी मध्यरात्री संसदेत बठक होते मग राम मंदिरासाठी का नाही, असा प्रश्न उपस्थित करून सरकार कोणाचेही येवो; पण राममंदिर झाले पाहिजे. कारण आम्हाला राम मंदिर प्रिय आहे, अशी भावना विश्व हिंदू परिषदेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडीया यांनी व्यक्त केली. या वेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली. साधला. त्यांना खुर्ची प्रिय असेल पण आम्हाला राम मंदिर प्रिय आहे, असे ते म्हणाले.

एका खासगी कार्यक्रमासाठी तोगडीया हे येथे आले होते. या वेळी त्यांनी विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. भाजपची सत्ता राम मंदिराच्या आश्वासनामुळे आली आहे. याचा विसर सरकारला पडता कामा नये. मोदी सरकारने राम मंदिर उभारण्यासाठी कायदा केला पाहिजे असे सांगून मंदिरालगत मशिदीला जागा दिली जाईल हे आपल्याला मान्य नसल्याचे तोगडीया म्हणाले. संसदेत अध्र्या रात्री जीएसटीसाठी बठक होते. राम मंदिरासाठी मग विलंब का, असा सवालही तोगडीया यांनी उपस्थित केला. देशामध्ये हिंदू अल्पसंख्याक होण्याची भीती आहे. अशावेळी सत्तास्थानी हिंदूच असले पाहिजेत. पंतप्रधानांसारख्या जबाबदारीच्या पदावर हिंदू व्यक्तीच विराजमान व्हावी मग भलेही ती कोणत्या का पक्षाची असेना, असेही तोगडीया यांनी या वेळी स्पष्ट केले. या वेळी आमदार डॉ. राहुल पाटील, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांची उपस्थिती होती.

डॉ. तोगडीया हे बजरंग दलाचे जिल्हा संयोजक प्रकाश लाखरा यांच्या विवाहासाठी येथे आले होते. औरंगाबादहून येथे आल्यानंतर दत्त नगरातील प्रल्हाद कानडे यांच्या निवासस्थानी त्यांनी शहरातील व्यापारी व इतर घटकांशी संवाद साधला. शेतीत रासायनिक खतांचा वापर करू नये, असे आवाहनही या वेळी त्यांनी केले.