ज्यांना मराठीच्या भवितव्याची चिंता वाटते, त्यांनी इंग्रजीच्या स्पर्धेत उतरून मराठी आत्मसात केले पाहिजे. उद्या येणाऱ्या गुलामगिरीला प्रतिकार करणारे मराठी किंवा इतर जनभाषा हेच एकमेव हत्यार पुरोगामी चळवळीच्या हातात असेल म्हणून तिला जिवंत ठेवणे आणि समृद्ध करणे ही गोष्ट पुरोगाम्यांच्या कार्यक्रम पत्रिकेवर प्राधान्याने असावी, असे स्पष्ट मत डॉ. रावसाहेब कसबे यांनी व्यक्त केले. कोल्हापूर येथील श्रमिक प्रतिष्ठान आणि नाशिक येथील कविवर्य नारायण सुर्वे वाचनालय यांच्या वतीने येथे आयोजित पाचव्या कॉम्रेड अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलनाचे उद्घाटन शनिवारी कविवर्य लहू कानडे यांच्या हस्ते तर डॉ. कसबे यांच्या अध्यक्षतेखाली झाले. यावेळी ते बोलत होते. महाकवी कालिदास कलामंदिर येथे झालेल्या संमेलनस्थळास ‘बाबुराव बागूल साहित्य नगरी’ असे नांव देण्यात आले आहे. उद्घाटन सोहळ्यापूर्वी अण्णा भाऊ साठे पुतळा ते महाकवी कालिदास कला मंदिर या मार्गावर प्रबोधन फेरी काढण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री छगन भुजबळ, गोविंद पानसरे, कवी सतीश काळसेकर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विविध ग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले. कसबे यांनी मराठी भाषा उद्धाराचे आणि तिच्या समृद्धीचे श्रेय एकटय़ा ज्ञानेश्वरांना देता येणार नसल्याचे सांगितले. त्यांचे योगदान मोलाचे आहे, याबद्दल कोणाचे दुमत असण्याचे कारण नाही. परंतु, मराठी भाषेच्या उद्धाराचे आणि समृद्धीचे श्रेय द्यायचेच असल्यास ते श्री चक्रधरस्वामी आणि त्यांच्या महानुभाव पंथालाच दिले पाहिजे, असे त्यांनी नमूद केले. अण्णा भाऊंची संत व त्यांच्या वाड्.मयाकडे बघण्याची दृष्टी भावनिक होती. त्याला कारण त्यांच्यावर असलेला राष्ट्रवादाचा प्रभाव हे होय, असेही डॉ. कसबे यांनी नमूद केले. कविवर्य कानडे यांनी फुले, शाहू व आंबेडकर यांच्या विचारांवर प्रेम करणाऱ्यांनी एकत्र येऊन संघटित होण्याची गरज मांडली. संमेलनाच्या स्वागताध्यक्षा डॉ. मनीषा जगताप यांनी महाराष्ट्रातील वर्गीय लढय़ांचा आणि सामाजिक परिवर्तनासाठी झालेल्या संघर्षांचा इतिहास नाशिकशिवाय कधीही पूर्ण होऊ शकणार नसल्याचे सांगितले.