मराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ कलावंत आणि भरत नाट्य संशोधन मंदिर या संस्थेचे माजी अध्यक्ष प्रभाकर करंदीकर यांचे शुक्रवारी रात्री निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. त्यांच्या मागे तीन विवाहित मुली आहेत. त्यांच्या पत्नी सुधा यांचे बाराच दिवसांपूर्वी निधन झाले होते. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी सकाळी दहा वाजता वैकुठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अगदी लहानपणापासून संगीत शिक्षण घेतलेल्या करंदीकरांनी शास्त्रीय संगीताची तालीम यशवंतबुवा मराठे व नंतर छोटा गंधर्व यांच्याकडे घेतली होती. त्यानंतर भरत नाट्य मंदिर, सेंट्रल रेल्वे कल्चरल अकादमी, मराठी रंगभूमीच्या माध्यमातून त्यांनी संगीत रंगभूमीवर सुमारे पाचशेहून अधिक प्रयोग सादर केले होते. संगीत सौभद्र, संगीत मंदार माला, संगीत स्वयंवर, संगीत संशयकल्लोळ, संगीत वैरीण झाली सखी, शाहीर प्रभाकर, संगीत अभोगी या नाटकांमध्ये प्रमुख भूमिका केल्या होत्या. राज्य संगीत नाट्य स्पर्धेत सलग तीन वर्षे सुवर्ण पदक मिळविण्याचा बहुमानही त्यांनी मिळविला होता. पुणे महानगरपालिकेने मानाचा बालगंधर्व पुरस्कार देऊन त्यांना गौरविले होते.

ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक नरूभाऊ लिमये यांच्या नंतर भरत नाट्य संशोधन, मंदिराच्या अध्यक्षपदाची धुरा त्यांनी अनेक वर्षे सांभाळली. त्यापूर्वी ही त्यांनी त्या संस्थेमध्ये अनेक पदे भूषविली. गेले काही महिने त्यांची तब्येत बरी नव्हती. त्यातच पत्नीच्या निधनाचा धक्का ते सहन करू शकले नाहीत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Performer of marathi music theatre prabhakar karandikar passed away
First published on: 22-09-2018 at 10:22 IST