04 July 2020

News Flash

खरीप हंगामावर दुष्काळाचे संकट

मान्सूनचा पाऊस लांबल्याने खरीप हंगाम पुन्हा अडचणीत सापडला आहे. जूना महिना कोरडाच गेल्याने शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. खरीप पेरणीस सज्ज झालेला शेतकरी आता पाऊस कधी

| June 28, 2014 01:45 am

मान्सूनचा पाऊस लांबल्याने खरीप हंगाम पुन्हा अडचणीत सापडला आहे. जूना महिना कोरडाच गेल्याने शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. खरीप पेरणीस सज्ज झालेला शेतकरी आता पाऊस कधी पडेल, याच एका आशेवर आहे. जिल्हय़ातील जवळपास सर्वच तलाव आटले असून, महत्त्वाच्या धरणांनीही तळ गाठला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाईही मोठय़ा प्रमाणात भेडसावण्याची शक्यता आहे.
जिल्हय़ात जूनच्या पहिल्या आठवडय़ात पडलेल्या पावसानंतर जूनच्या शेवटच्या आठवडय़ापर्यंत वरुणराजा बरसलाच नाही. पूर्ण महिना कोरडा गेल्याने शेतकरी चिंताक्रांत आहेत. जिल्हय़ातील अनेक लघु, मध्यम प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. मांजरासारख्या मोठय़ा धरणांनीही तळ गाठला आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई भेडसावू लागली आहे.
जिल्हय़ात सध्या १७५ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. माजलगाव, िबदुसरा धरणांनी तळ गाठला आहे. भूगर्भातील पाणीपातळीतही लक्षणीय घट झाली आहे. पाच लाखपेक्षा अधिक हेक्टर क्षेत्रावरील पेरणी पावसाअभावी खोळंबली आहे. दोन वर्षांपूर्वी दुष्काळाची झळ सोसणाऱ्या बीड जिल्हय़ास आताही दुष्काळाची धग सहन करावी लागणार काय, अशी भीती व्यक्त होऊ लागली आहे.
जालन्याच्या २४ गावांना ३१ टँकरने पाणीपुरवठा
वार्ताहर, जालना
पावसाअभावी जालना जिल्ह्य़ात खरीप पेरण्या खोळंबल्या आहेत. जिल्ह्य़ातील २४ गावे आणि ८ वाडय़ांना ३१ टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे.
जालना ५, बदनापूर ६, जाफराबाद १, अंबड ११ आणि घनसावंगी १ याप्रमाणे टँकर सुरू आहेत. भोकरदन, परतूर व मंठा तालुक्यांत अजून टँकर सुरू नाही. खासगी १७, तर अन्य १४ टँकरमार्फत पाणीपुरवठा होत आहे. ३५ विहिरी टँकर भरण्यासाठी अधिग्रहीत केल्या आहेत. जिल्ह्य़ात सात मध्यम प्रकल्पांतील सरासरी जलसाठा दहा टक्के आहे. जिल्ह्य़ातील ५७ लघु पाटबंधारे प्रकल्पांतील जलसाठा ५ टक्के आहे.
मुख्यमंत्र्यांकडून आढावा
मुख्यमंत्र्यांनी शुक्र वारी जालना जिल्ह्य़ातील पाऊस, पेरणी आणि संबंधित बाबींचा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेतला. त्यावेळी जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लांबलेल्या पावसामुळे जिल्ह्य़ात उद्भवणाऱ्या परिस्थितीची माहिती दिली.
हिंगोलीतील १४ तलावांत केवळ २५ टक्के पाणीसाठा
वार्ताहर, हिंगोली
जून महिना पावसाअभावी कोरडाच गेल्याने जिल्हय़ात महत्त्वाच्या तलावांतील पाणीसाठे जोत्याच्या खाली गेले आहेत. जिल्ह्यात ३ धरणांसह २६ लघु प्रकल्प असून, १२ तलावांतील पाणी जोत्याच्या खाली, तर १४ तलावांत २५ टक्के पाणीसाठा आहे. मात्र, सिद्धेश्वर धरणात शून्य टक्के पाणीसाठा असून, यलदरी ४३.०९ व इसापूर धरणात २५.७८ टक्के साठा आहे.
पाऊस लांबल्याने जिल्ह्यात पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता बळावली आहे. िहगोली शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सिद्धेश्वर धरणात केवळ मृतसाठा शिल्लक आहे. इसापूर धरणातून कळमनुरी, बाळापूर भागात पाणीपुरवठा होतो. इसापूर धरणात ४५.७८ टक्के पाणीसाठा आहे. यलदरी धरणाची क्षमता मृतसाठा १२४.६७७ दलघमी, जिवंत साठा ८०९.२६३ दलघमी (एकूण ९२३.९४ दलघमी), आजमितीला उपलब्ध पाणीसाठा ४३.०९ टक्के आहे. यात मृतसाठा १२४.६७७ दलघमी, जिवंत साठा ३४८.७४५ दलघमी असा एकूण ४७३.४२२ दलघमी साठा आहे. सध्या कळमनुरीच्या साईनगरमध्ये एका टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे, तर िहगोली तालुक्यातील बळसोंड परिसरात टँकरची मागणी जोर धरत आहे. नांदेडात २० गावांना २२ टँकर
वार्ताहर, नांदेड
मृगापाठोपाठ आद्र्रा नक्षत्रही कोरडे गेल्याने बळीराजाची चिंता चांगलीच वाढली आहे. जिल्ह्यात २२ टँकरने २० गावांना  पाणीपुरवठा केला जात आहे. आणखी काही ठिकाणी टँकरची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
मृग नक्षत्र कोरडे गेल्यानंतर आद्र्रात तरी पाऊस पडेल, असे वाटत होते. परंतु जूनचा शेवटचा आठवडाही कोरडाच गेला. जिल्ह्यात अनेक छोटय़ा-मोठय़ा प्रकल्पातील पाणीसाठाही आता तळाला गेला आहे. जिल्ह्यातील ऊध्र्व पनगंगा, मानार, विष्णुपुरी प्रकल्पातील पाणीसाठा कमालीचा घटला आहे. मध्य प्रकल्पातील ऊध्र्व पनगंगा व महािलगी प्रकल्पांची अवस्था यापेक्षा वेगळी नाही. पावसाने डोळे वटारल्याने प्रकल्पातील पाणीसाठा कमी झाला. शिवाय भूगर्भातील पाणीसाठय़ातही लक्षणीय घट झाली.
जिल्ह्यात आजमितीस २२ टँकरद्वारे २० गावांना पाणीपुरवठा केला जात आहे. गतवर्षी आजपर्यंत १९३.५३ मिमी पावसाची नोंद झाली होती. यंदा केवळ २५.३३ मिमी पाऊस पडला आहे. शेतकऱ्यांनी खरीप पेरणीची तयारी पूर्ण केली. खते-बियाणांची खरेदीही झाली. मात्र, पावसाने डोळे वटारल्याने बळीराजाच्या डोळ्यात पाणी आले आहे. पाणीटंचाईची निकड लक्षात घेऊन नवीन ३६२ िवधन विहिरींना मंजुरी देण्यात आली. पकी १८२ िवधन विहिरी तयार झाल्या आहेत.
जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी शुक्रवारी जिल्ह्यातील पाणीटंचाई, वेगवेगळ्या भागात पेरणीची अवस्था व संभाव्य उपाययोजनांबाबत मुख्यमंत्र्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे माहिती दिली. १०७ नळ पाणीयोजनांची दुरुस्ती करण्यात आली होती. पकी १४ पाणीयोजनांना मंजुरी दिल्याने हे काम सध्या प्रगतिपथावर आहे. सोळा तालुक्यातील सार्वजनिक विहिरींमधील गाळ काढण्यासाठी ६० गावांची नावे पुढे आली. मात्र, यातील एकाही विहिरीतील गाळ काढण्यात आला नाही. पावसाने दडी मारल्याने शहरातील पाणीटंचाई तीव्र झाली असली, तरी ३१ जुलपर्यंत शहराला पुरवठा करण्याइतपत पाणी विष्णुपुरी जलाशयात असल्याचे सूत्रांनी सांगितले.
नांदेड जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान्य ९५४ मिमी आहे. गेल्या ३ वर्षांत बऱ्यापकी पाऊस पडल्याने भूजल पातळीत वाढ झाली होती. पण यंदा पावसाची दडी व उन्हाची तीव्रता यामुळे भूजल पातळीतही कमालीची घट झाली आहे. सन २००८ पासून टंचाईअंतर्गत केलेल्या वेगवेगळ्या उपाययोजनांवर लाखो रुपयांचा निधी खर्च झाला. गेल्या ३-४ वर्षांत तत्कालीन अधिकाऱ्यांनी लाभक्षेत्रात सिंचनाचे वेगवेगळे प्रयोग राबवल्याने त्याचा बऱ्यापकी फायदा झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 28, 2014 1:45 am

Web Title: peril of drought beed
टॅग Beed,Dam,Drought,Tanker
Next Stories
1 हिंगोलीतील कृषी सहायकास गारपीटग्रस्तांची बेदम मारहाण
2 रब्बीतील गारपीटग्रस्तांनाच सरकारकडून मदतीचा लाभ!
3 ‘टाकसाळे यांचे निलंबन नेत्यांना वाचवण्यासाठीच’
Just Now!
X