विजेमुळे उद्योग येतात आणि रोजगारनिर्मिती होते त्यामुळे केंद्र सरकार आगामी काळात वीज उत्पादनावर भर देणार असून देशातील प्रत्येक गावात, प्रत्येक घरात २४ तास वीज पुरविण्याचे लक्ष्य असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले. मौदा येथे ‘एनटीपीसी’च्या वीज प्रकल्पाच्या लोकार्पण कार्यक्रमावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले की, “वीजेच्या उपलब्धतेवर प्रगतीचा वेग ठरतो त्यामुळे वीज संदर्भातील प्रकल्पांना आमच्या सरकारचे प्राधान्य असेल. देशात सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर व्हावा यासाठी देखील सरकार प्रयत्नशील आहे.”
प्रधानमंत्री जन-धन योजनेचाही मोदींनी यावेळी उल्लेख केला. सावकारच्या कर्जबाजारीमुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत, मात्र आता शेतकऱयांसह सर्वांसाठी जन-धन योजना लाभदायक ठरेल या योजनेच्या अंतर्गत देशातील प्रत्येक नागरिकाचा एक लाख रुपयांचा विमा उतरवणार असल्याचे मोदी म्हणाले.
वीज बचत ही सुद्धा काळाची गरज असून प्रत्येक कुटुंबाने प्रतिमहिना वीज बचतीचे लक्ष्य ठेवावे असे आवाहनही मोदींनी केले. शाळा, महाविद्यालयांमध्ये वीज वाचविण्याची शपथ द्यायला हवी. शाळेतील विद्यार्थ्यांना वीज बचतीचे धडे द्यायला हवेत. वीजबचतीची सवल लागल्यास यातून आपोआप बदल होईल असा सल्लाही मोदींनी यावेळी दिला.