News Flash

ठोक किराणा,भुसार मालाच्या विक्रीस सकाळी ७ ते ११ परवानगी

राज्य सरकारच्या ब्रेक दी चेन अंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी सुधारित आदेश लागू केले.

नगर शहरातील ठोक किराणा व भुसार मालाच्या दुकानांना व्यवहारास परवानगी दिल्यानंतर बुधवारी सकाळी दाळमंडई व आडते बाजारात गर्दी उसळून वाहतूक व्यवस्था कोलमडली होती.

दाळमंडई,आडते बाजारात उसळली गर्दी; वाहतूक व्यवस्थाही कोलमडली

नगर : जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिल्यामुळे आज, बुधवारी सकाळपासून नगर शहरासह जिल्ह्यतील ठोक किराणासह भुसार मालाच्या दुकानांतील व्यवहार सोमवार ते शनिवार सकाळी ७ ते ११ या कालावधीसाठी  सुरू झाले. नगर शहरातील दाळमंडई, आडतेबाजार या बाजारपेठांतील दुकाने उघडली. बाजार समितीच्या मुख्य वॉर्डातील भुसार मालाच्या विक्रीलाही परवानगी देण्यात आली आहे. हे व्यवहार आज सुरू झाल्यानंतर आडतेबाजार, दाळमंडईमध्ये गर्दी उसळली व वाहतूक व्यवस्था कोलमडली. त्याचा परिणाम शहरातील शहराच्या इतर भागातील वाहतूक व्यवस्थेवर झाला.

ग्रामीण भागातील किराणा दुकाने व भाजीपाला विक्री सुरू असली, तरी नगर शहरातील किराणा दुकाने व भाजीपाला विक्री गेल्या महिन्यापासून करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार बंदच ठेवण्यात आली होती.

राज्य सरकारच्या ब्रेक दी चेन अंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी सुधारित आदेश लागू केले. त्यानुसार नगर शहरातील किराणा दुकाने, भाजीपालासह मटण-अंडी-मासे विक्रीसाठी सोमवारीपासून सकाळी ७ ते ११ या वेळेत परवानगी देण्यात आली. मात्र शहरातील आडतबाजार व्यापारी संघटनेने महापालिका आयुक्त व जिल्हाधिकारी यांची भेट घेत दाळमंडई, आडतेबाजार या व्यापारी पेठा सुरू करण्याची मागणी केली होती. किराणा दुकाने सुरू झाली असली, तरी त्यांना पुरवठा करणारी ठोक मालाची दुकाने बंद असल्यामुळे व्यवहार सुरळीत होणार नाहीत, असेही संघटनेचे म्हणणे होते.

त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी काल, मंगळवारी रात्री बाजार समिती, दाळमंडई, आडतेबाजार परिसराची पाहणी केली. र्मचट बँकेचे अध्यक्ष अनिल पोखरणा, संघटनेचे सचिव संतोष बोरा, कमलेश भंडारी, नगरसेवक संजय चोपडा, विपुल शेटीया आदी उपस्थित होते. व्यापारी संघटनेने करोना प्रतिबंधक उपाययोजनांचे नियम पाळण्याचे आश्?वासन दिल्यामुळे आज सकाळपासून बाजार समितीतील मुख्य वॉर्डसह दाळमंडई, आडतेबाजारातील ठोक किराणा व भुसार मालाच्या दुकानांना उघडण्यास परवानगी देण्यात आली.

बाजार समितीच्या मुख्य वॉर्डसह दाळमंडई, आडते बाजारातील दुकाने सुरू होताच जणूकाही सर्वच दुकाने सुरू करण्यास परवानगी दिल्याचे वातावरण सकाळी निर्माण झाले व नागरिक वाहनांसह रस्त्यावर आले. त्यामुळे दाळमंडई, आडते बाजार परिसरात वाहतूक कोंडी झाली. त्याचा परिणाम शहरातील इतर रस्त्यावरील वाहतुकीवरही झाला. तेलीखुंट, जुनी वसंत टॉकीज, सर्जेपुरा या भागातही गर्दी व वाहतूक कोंडी काही काळ जाणवली.

बाजार समितीमधील भुसार व्यवहारास परवानगी

बाजार समितीच्या मुख्य वॉर्डातील भुसार व्यवहार सोमवार ते शनिवारी सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरू करण्यास परवानगी देण्यात आली असली, तरी फळे व भाजीपाला विक्रीस मनाई करण्यात आली आहे. नगर बाजार समितीच्या नेप्ती उपबाजार समितीत भाजीपाला विक्रीस पूर्वीच परवानगी देण्यात आली आहे. संगमनेर बाजार समितीच्या मुख्य वॉर्डमध्ये भुसार व कांदा सोमवार ते शनिवारी सकाळी ७ ते ११ या वेळेत तर वडगावपान उपबाजार समितीमधील फळे व भाजीपाला व्यवहारास परवानगी देण्यात आली आहे.

शनिवारी सकाळ ते सोमवार सकाळ वीकेण्ड लॉकडाउन

ठोक किराणा व भुसार मालाच्या व्यवहारास सकाळी ७ ते ११ या वेळेत परवानगी देण्यात आली असली, तरी ही परवानगी केवळ सोमवार ते शनिवारी या कालावधीसाठीच आहे. शनिवारी सकाळी ११ नंतर ते सोमवारी सकाळी ७ पर्यंत वीकेंड लॉकडाउन सुरूच राहणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात ही बाब स्पष्ट करण्यात आली आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2021 3:08 am

Web Title: permission for sale of bulk groceries scrap goods from 7 to 11 in the morning ssh 93
Next Stories
1 पारनेरमधील अवैध व्यवसायांसह वाळू तस्करांवर कारवाई करा – राजे
2 मराठा आरक्षणाचा लढा हा सर्व पातळीवर लढणार – आ. राधाकृष्ण विखे
3 रत्नागिरी जिल्ह्यात शाळा, अंगणवाड्यांची दुरुस्ती रखडली
Just Now!
X