एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी उमेदवारांना केंद्र बदलण्यास मुभा देण्याच्या निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आला आहे. यासंदर्भात महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे एक परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. पुणे महसूली विभागाच्या बाहेरच्या ज्या उमेदवारांनी राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी पुणे केंद्र निवडले आहे, त्यांना केंद्र बदलण्याची मुभा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिली असल्याचं या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे.

काही दिवसांपूर्वी राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली होती. करोनाच्या पार्श्वभूमीवर यापूर्वी सुरक्षिततेच्या कारणास्तव ही परीक्ष पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर आता ही परीक्षा २० सप्टेंबर २०२० रोजी घेण्यात येणार आहे. दरम्यान, आता एमपीएसचीच्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी केंद्र बदलण्याची मुभा देण्यात आली आहे. केंद्र बदलणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या महसुली विभागाच्या मुख्यालयाचे केंद्र निवडता येईल. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या सुरक्षिततेचा विचार करून आयोगाने हा निर्णय घेतला आहे. आयोगाने परीक्षा घेणार असल्याचे जाहीर केल्यानंतर केंद्र बदलण्याची परवानगी देण्याची मागणी उमेदवारांसह लोकप्रतिनिधी करण्यात येत होती.

खेड्यापाड्यातील गरीब आणि होतकरू उमेदवार, दुर्गम भागातील उमेदवारांना सध्याच्या परिस्थितीत अन्य जिल्ह्यांमध्ये परीक्षा केंद्रांवर उपस्थित राहण्यात येणाऱ्या अडचणी, लॉकडाउनपूर्वी पुणे शहरात आयोगाच्या परीक्षांसाठी मोठ्या प्रमाणात पुण्याबाहेरील उमेदवार उपस्थित होते. परंतु करोनाच्या पार्श्वभूमीवर ते आपल्या मूळ गावी परत गेले आहेत. त्यामुळे त्यांना परीक्षांसाठी उपस्थित राहणं कठिण होणार आहे. तसंच अन्य प्रशासकीय बाबींचा विचार करून विषयांकित परीक्षेसाठी केवळ पुणे जिल्हा केंद्र निवडलेल्या उमेदवारांना त्यांच्या महसूली मुख्यालयाच्या ठिकाणचे परीक्षा केंद्र निवडण्याची मुभा देण्याचा निर्णय आयोगानं घेतला आहे.

पुणे जिल्हा केंद्र निवडलेल्या उमेदवारांपैकी पुणे महसूली विभागाच्या बाहेरील जिल्हा आणि शहरांमध्ये कायमस्वरूपी रहिवासाचा पत्ता नमूद असलेल्या उमेदवारांना त्यांच्या महसूली विभागांच्या मुख्यालयाचे केंद्र निवडण्याची मुभा देण्यात आली आहे. यामध्ये मुंबई, नाशिक, औरंगाबाद, नागपूर आणि अमरावतीचा समावेश आहे. तर पुणे महसूली विभागांतर्गत असलेल्या पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील कायमस्वरूपी वास्तव्याच्या पत्ता असलेल्या उमेदवारांना जिल्हा केंद्र बदलण्याची परवानगी नसेल. दरम्यान, केंद्र बदलायचं असल्यान ऑनलाइन अर्ज प्रणालीमधील उमेदवारांच्या प्रोफाईलद्वारे १७ ऑगस्ट रोजी दुपारी २ ते १९ ऑगस्ट रोजी रात्री २३.५९ वाजेपर्यंत उमेदवारांना जिल्हा केंद्र निवडण्याची संधी देण्यात येईल. तसंच पात्र उमेदवारांना एसएमएसद्वारे याबाबत माहिती देण्यात येणार असल्याचंही आयोगानं स्पष्ट केलं आहे. केंद्रांची क्षमता पाहता प्रथम येणाऱ्यास प्राधान्य देण्यात येणार असल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे.