शेतकऱ्यांचा आगामी खरीप हंगाम वाया जावू नये  म्हणून वर्धा जिल्हा प्रशासनाच्यावतीने कृषी सेवा केंद्र सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. आगामी हंगामात शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी ही सवलत देण्यात आली आहे. यापूर्वी शेतकऱ्यांना गावातील शेतीकामे करण्याची मूभा देवून प्रशासनाने दिलासा दिला होता.

संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर खेड्यापाड्यातील सर्व कामे ठप्प झाली होती. शेतीची मशागत तसेच चणा, गहू आदी पिके कापणीला आली होती. ही कामे बंद झाल्याने शेतकरी चिंतातूर झाला होता. मात्र काही दिवसापूर्वी अशी शेतीकामे करण्याची मूभा देण्यात आली होती. कामे करतांना गर्दी करू नये, एकाच ठिकाणी मजूरांचा घोळका होवू नये व ठराविक सुरक्षित अंतर पाळण्याची सूचना करण्यात आली होती.

आता मशागतीचा व यंत्रे तयार करून ठेवण्याची वेळ असल्याने जिल्हाधिकारी विवेक भीमनवार प्रतिबंधात्मक कायद्यातील काही तरतूदीचा आधार घेत कृषी सेवा केंद्र सुरू करण्याचे परवानगी दिली.

सकाळी सात ते दुपारी दोन  वाजेदरम्यान ही दुकाने सुरू ठेवण्याचे बंधन आहे. तसेच फवारणी व अन्य शेतीविषयक यंत्राची विक्री व दुरूस्ती दुकाने सुरू ठेवण्याची मुभा मिळाली आहे. मंगळवारी सायंकाळी उशीरा निघालेल्या या आदेशानूसार या दुकानांमध्ये सर्व व्यवहार करतांना मालक व ग्राहकांनी एक मीटरचे अंतर ठेवण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे.