निखिल मेस्त्री

पालघरनजीक समुद्रात नियमांचे पालन न करता मासेमारी; पारंपरिक मासेमारीला धोका

पालघर जिल्ह्य़ातील समुद्रात बहुतांश मासेमारी क्षेत्रात पर्ससीन व एलईडी दिव्याच्या प्रकाशावर मासेमारीचा बेसुमार वापर वाढल्याने पारंपरिक मासेमारीला धोका निर्माण झाला आहे. मत्स्यव्यवसायासाठी पूरक असलेल्या या भागातील मत्स्यसाठे पर्ससीन मासेमारीमुळे नष्ट होऊ लागले आहेत. वडराई, डहाणू भागातील कव क्षेत्रात अशा प्रकारची मासेमारी मोठय़ा प्रमाणात चालत असल्याने कव नष्ट होत असल्याचा आरोप मासेमारांनी केला आहे.

मच्छीमार मासेमारी करून परतल्यावर पर्ससीनधारक या क्षेत्रात शिरकाव करतात. कोणत्याही नियमाचे पालन न करता मोठमोठय़ा बोटींमार्फत त्यांच्याकडून बेसुमार मासेमारी केली जाते. मत्स्यविभागामार्फत अशा पद्धतीच्या मासेमारीला बंदी असली तरी समुद्रातील निषिद्ध क्षेत्रात शिरकाव करून पर्ससीन नेटधारक मासेमारी करत आहेत. हा धुमाकूळ घालणाऱ्या पर्ससीन नौकांवर मत्स्य विभागाकडून कारवाई होत नसल्याचा आरोप मच्छीमारांनी केला आहे.

पालघर जिल्ह्य़ातील मच्छीमार कव (गिलनेट व डोलनेट) पद्धतीने मासेमारी करत आहेत. पर्ससीन मासेमारी करणाऱ्या नौका चुकीच्या पद्धतीने मासेमारी करत असल्यामुळे कव नष्ट होऊन त्याच्या जाळीचे नुकसान होत आहे. मत्स्यव्यवसाय विभागाने दिलेल्या पर्ससीन मासेमारीसाठीच्या परवान्याहून अधिक आणि अनधिकृत पर्ससीनधारक नौका असून अशा अनधिकृत व परवाने नसलेल्या पर्ससीनधारकांवर कारवाई का होत नाही, असा सवाल मच्छीमार संघटनांनी विचारला आहे.

बेकायदा नौकांवर कारवाई करण्यासाठी कायद्यात कठोर बदल करण्यात यावेत आणि ते लवकरात लवकर अमलात आणावेत, अशी मागणी मच्छीमार संघटनांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्याला प्रतिसाद देत अशा बेकायदा मासेमारी करणाऱ्या नौकांवर कारवाई करण्याचे अधिकार तटरक्षक दलाला देण्यात येतील, असे जाहीर आश्वास मुख्यमंत्र्यांनी दिले होते. मात्र अद्याप त्याची अंमलबजावणी झाली नाही. परिणामी पर्ससीनधारकांचा येथे बेसुमार वावर सुरू असून यामुळे पारंपरिक पर्ससीन पद्धतीच्या चुकीच्या मासेमारीमुळे पारंपरिक मच्छीमारांचे अस्तित्व धोक्यात आल्याने अनेकदा मत्स्यव्यवसाय विभागाकडे पत्रव्यवहार केलेला आहे. मात्र त्यावर अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही. मच्छीमार विविध समस्यांनी ग्रासला असून शासनाचे याकडे दुलैक्ष केलेले आहे. शासनाने याकडे जातीने लक्ष द्यावे, अन्यथा अन्यायाविरोधात मच्छीमार आंदोलन करतील.

– मानेंद्र आरेकर, अध्यक्ष, वडराई मच्छीमार सहकारी सोसायटी