एकनाथ खडसे येत्या शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांचा हा निर्णय म्हणजे भाजपासाठी झटका आहे. कारण पक्ष एका ज्येष्ठ, अनुभवी नेत्याला मुकणार आहे. पण खडसे ज्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत, त्या पक्षावर त्यांनी कधीकाळी खूप टीका सुद्धा केली होती. राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदी असताना त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले होते.
आणखी वाचा- भाजपाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर खडसेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
पक्ष सोडण्याचे निश्चित झाल्यानंतर एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना पत्रकारांनी ज्या राष्ट्रवादी काँग्रेसवर तुम्ही प्रचंड टीका केली, त्याच पक्षामध्ये, त्यांच्या सरकारमध्ये सहभागी होणार आहात, असा प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी “मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर कधीही व्यक्तीगत टीका केली नाही. मी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारवर टीका केली, त्यावेळी मी राज्याचा विरोधी पक्षनेता होतो” असे उत्तर दिले.
आणखी वाचा- ‘त्या’ वक्तव्यानंतर जे घडलं ते महाराष्ट्राला माहिती; एकनाथ खडसेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
२०१४ मध्ये भाजपा-शिवसेना युती तोडण्याच्या प्रश्नावर ते म्हणाले की, “हा निर्णय माझा एकटयाचा नव्हता, सामूहिक होता. विरोधी पक्षनेता या नात्याने तो जाहीर करण्याची जबाबदारी माझ्यावर होती.”
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 21, 2020 2:57 pm