News Flash

मिरजेजवळ ऐतिहासिक विहिरीमध्ये पेशवेकालीन शिलालेख

मिरज तालुक्यातील बेडग येथे ऐतिहासिक बावाच्या विहिरीत सन १७९३ सालातील पेशवेकालीन शिलालेख आढळून आला आहे

(संग्रहित छायाचित्र)

दिगंबर शिंदे

मिरजेपासून बारा किलोमीटर अंतरावर असलेल्या बेडग येथे ऐतिहासिक बावाच्या विहिरीमध्ये पेशवेकालीन शिलालेख आढळला आहे. इ.स. १७९३ मधील या शिलालेखाचे लेखन देवनागरीमध्ये केले आहे. गिरी संप्रदायातील साधूंनी या विहिरीची बांधणी केली असून याचे संरक्षण हिंदू व मुस्लीम व्यक्तींनी करावे असे शिलालेखात म्हटले आहे.

मिरज तालुक्यातील बेडग येथे ऐतिहासिक बावाच्या विहिरीत सन १७९३ सालातील पेशवेकालीन शिलालेख आढळून आला आहे. सदरची विहीर गिरी संप्रदायातील साधूंनी बांधली असून, हिंदू आणि मुस्लीम व्यक्तींनी विहिरीचा बंदोबस्त ठेवावा, असा उल्लेख या लेखात आहे. मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक मानसिंगराव कुमठेकर आणि प्रा. गौतम काटकर यांनी या शिलालेखाचा अभ्यास केला आहे. या शिलालेखामुळे बेडग गावच्या इतिहासात मोठी भर पडली आहे.

बेडग गावच्या प्राचीनत्वाची साक्ष देणारा इसवी सन १२२२ चा एक यादवकालीन शिलालेख मिरज इतिहास संशोधन मंडळाच्या अभ्यासकांना दोन वर्षांपूर्वी महादेव मंदिरात आढळून आला होता. गावातील अंबाबाईच्या मंदिराजवळ असलेल्या बावाच्या ऐतिहासिक विहिरीत हा लेख आहे. भिंतीत वरील बाजूस सात ओळींचा एक शिलालेख आहे. सदर शिलालेख देवनागरीमध्ये असून लेखाच्या अभ्यासासाठी दिगंबर कोकाटे आणि गजानन कोकाटे यांचे सहकार्य लाभले.

बेडगेतील गिरी संप्रदायाच्या साधूंनी भवानीच्या देवळाजवळ सन १७९३ मध्ये धर्मशाळा आणि विहीर बांधली असून, या विहिरीचे संरक्षण हिंदू-मुस्लीम समाजातील अधिकारी आणि व्यक्तींनी करावे, असे या शिलालेखात म्हटले आहे. या शिलालेखात बेडग गाव अमीर-उल-उमराव नरसिंगराव घोरपडे यांच्याकडे इनाम असल्याचेही म्हटले आहे. या शिलालेखातून तत्कालीन गिरी संप्रदायाचा इतिहास उलगडणार आहे. पेशवेकालीन गिरी गोसाव्यांच्या इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी हा शिलालेख उपयुक्त ठरणार आहे.

या शिलालेखात म्हटले आहे, स्वस्तीश्री नृप शालिवाहन शके १७१५ कसबे बेडग प्रात मिरज येथे श्री भवानीनजिक तपोनिधी गोकुळगिरी गोसावी गुरू पर्वतगिरी मठ पुणे यांनी विहीर व धर्मशाळा धर्मार्थ बांधविली आहे. त्यास हिंदू व मुसलमान वगैरे जे कोणी या गावचे अधिकारी होईल, त्यांनी धर्म पाळणे स्मरणार्थ जाणून बंदोबस्त ठेवणे. असा मजकूर असून आडव्या ओळीत हा गाव इनाम राजश्री नरसिंगराव घोरपडे अमिरुल उमराव यासी’ असा मजकूर लिहिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 21, 2021 12:33 am

Web Title: peshwa inscriptions in a historical well near miraj abn 97
Next Stories
1 करोनाचे प्रमाण कमी करणारा ‘अमरावती पॅटर्न’ यशस्वी
2 जायकवाडीच्या पाणी उपलब्धतेमुळे अतिरिक्त उसाचा प्रश्न
3 Maharashtra Corona Update : २४ तासांत ५१९ रुग्णांचा मृत्यू; ६२,०९७ नवे करोनाबाधित!
Just Now!
X